वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा येथे दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका २६ वर्षीय तरुणाला वरणगाव पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी संशयिताकडून गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त केले असून, या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओझरखेडा येथील रोशन विकास पाटील (वय २६) याच्याकडे बेकायदेशीर शस्त्र असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरणगाव पोलिसांनी कारवाईची तयारी केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित कुमार बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मंगेश बेंडकोळी यांच्यासह पोलिस पथकाने संशयितावर लक्ष ठेवत सापळा रचला. पोलिसांनी संशयित रोशन पाटील याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची अंगझडती घेतली. या झडतीमध्ये त्याच्याकडे गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी तत्काळ हा मुद्देमाल जप्त केला. प्राथमिक चौकशीदरम्यान शस्त्र बाळगण्यासाठी त्याच्याकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे समोर आले. या प्रकरणी वरणगाव पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या शस्त्राचा वापर कशासाठी केला जाणार होता, तसेच त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, यासह विविध बाबींचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

या कारवाईत पीएसआय मंगेश बेंडकोळी, सुधाकर शिंदे, प्रशांत ठाकूर, मनोज म्हस्के, ईश्वर तायडे, भूषण माळी आणि फिरोज पठाण यांनी सहभाग घेतला. पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे संभाव्य अनुचित प्रकाराला आळा बसल्याचे मानले जात असून, परिसरातील नागरिकांमध्ये पोलिसांच्या कारवाईबाबत समाधान व्यक्त होत आहे. ओझरखेडा येथे गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस घेऊन फिरणाऱ्या तरुणाला अटक झाल्याने परिसरातील बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढील तपासातून या प्रकरणातील अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.



