Home क्राईम चोपड्यात पोलिसांची मोठी कारवाई! गावठी कट्टा आणि जिवंत कारतुसांसह सुरतचा तरुण जेरबंद

चोपड्यात पोलिसांची मोठी कारवाई! गावठी कट्टा आणि जिवंत कारतुसांसह सुरतचा तरुण जेरबंद

0
26

चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गुजरात राज्यातील अट्टल गुन्हेगाराला चोपडा शहर पोलिसांनी अत्यंत शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत. हा आरोपी हाफ मर्डर (कलम ३०७), दरोडा, पोक्सो (POCSO), आणि ऍट्रॉसिटीसारख्या गंभीर ५ गुन्ह्यांमध्ये संशयित असून, चोपड्यात त्याला देशी बनावटीचा गावठी कट्टा व जिवंत कारतूसांसह रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून कार व मोबाईलसह एकूण ८ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

चोपडा शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी पोलीस काँस्टेबल गुलाब कोळी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे १९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास धनवाड रोडवरील ग्रामसेवक कॉलनी आणि रत्नलोक नगर परिसरात सापळा रचण्यात आला होता. पोलिसांनी संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या जयेश दिलीप पाटील (वय २४ वर्ष, रा. श्रीजी नगर सोसायटी, कपोदरा, सुरत, गुजरात) याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे १ देशी बनावटीचा कट्टा आणि ४ जिवंत कारतूस आढळून आले. याप्रकरणी त्याच्यावर आर्म ऍक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी जयेश पाटील हा गुजरात राज्यातील निष्णात आणि अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर सुरत व इतर भागात ३०७ (हत्या करण्याचा प्रयत्न), दरोडा, पोक्सो कायदा, ऍट्रॉसिटी यांसारखे ५ अत्यंत गंभीर गुन्हे दाखल आहेत. चोपड्यात त्याच्याकडून १ लाख रुपयांचा गावठी कट्टा, ४ हजार रुपयांची कारतूस, ७ लाखांची स्विफ्ट डिझायर कार (GJ-05 RK-3127), २४ हजार रुपये किमतीचे ५ मोबाईल फोन व ४ सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत.

पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत. इतक्या गंभीर गुन्ह्यांतील आरोपी जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात कशासाठी आला होता आणि तो कोणाला हे घातक शस्त्र पुरवणार होता, याचा सखोल शोध आता पोलीस घेत आहेत.

गुजरातमध्ये दरोडा, हाफ मर्डर, पोक्सो आणि ऍट्रॉसिटीसारखे ५ गंभीर गुन्हे दाखल असलेला अट्टल गुन्हेगार जयेश पाटील याला चोपडा पोलिसांनी गावठी कट्ट्यासह बेड्या ठोकल्या आहेत.


Protected Content

Play sound