भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । विजयादशमीनिमित्त भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात पारंपरिक पद्धतीने शस्त्रपूजन करण्यात आले. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. दरम्यान, देवी विसर्जन मिरवणुका शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडाव्यात, यासाठी भुसावळ शहरात पोलिसांतर्फे पथसंचलन करण्यात आले. तसेच, मिरवणुकीदरम्यान प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात आयोजित शस्त्रपूजन कार्यक्रमाला भुसावळ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. विजयादशमीच्या पारंपरिक महत्त्वानुसार पोलिसांनी शस्त्रपूजन करून हा सण साजरा केला. देवी विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडाव्यात, या उद्देशाने पोलिसांनी पथसंचलन केले. या माध्यमातून नागरिकांना शांतता राखण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजेचा आवाज निर्धारित मर्यादेत ठेवावा, ध्वनिप्रदूषणासंदर्भातील नियमांचे पालन करावे, तसेच गुलालाची उधळण टाळून फुलांची उधळण करावी, अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. सण-उत्सव साजरे करताना सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि परस्पर आदराची भावना जपावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, देवी विसर्जनासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून रात्री १२ वाजेपर्यंतची वेळ निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी निर्धारित वेळेतच विसर्जन सोहळा पूर्ण करावा. मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घ्यावी आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



