Home आरोग्य जामुनझिरा आरोग्य केंद्रात डॉक्टर गैरहजर; परिचारिकेने केली प्रसूती, चौकशीसाठी आरोग्य विभागाची धाव

जामुनझिरा आरोग्य केंद्रात डॉक्टर गैरहजर; परिचारिकेने केली प्रसूती, चौकशीसाठी आरोग्य विभागाची धाव

0
16


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या जामुनझिरा या दुर्गम आदिवासी पाड्यावर आरोग्य सेवेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. प्रसूतीसाठी आरोग्य केंद्रात दाखल झालेल्या महिलेची वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित असताना परिचारिकेने प्रसूती केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेची माहिती आरोग्य विभागापर्यंत पोहोचताच जिल्हा आरोग्य अधिकारी आणि आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत चौकशी केली असून संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जामुनझिरा येथील रहिवासी पिंकी बारेला या गर्भवती महिलेला ७ जून रोजी प्रसूतीसाठी सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. यावेळी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने परिचारिकेनेच प्रसूतीची जबाबदारी सांभाळली. सुदैवाने प्रसूती सुरळीत आणि नैसर्गिक पद्धतीने पार पडली. मात्र प्रसूतीसारख्या महत्त्वाच्या वेळी डॉक्टर अनुपस्थित असल्याची बाब समोर आल्यानंतर आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या प्रकरणासोबतच आरोग्य केंद्रात पिण्याच्या पाण्याची अपुरी सुविधा, रुग्णांसाठी आवश्यक सोयी-सुविधांचा अभाव तसेच अन्य समस्यांबाबतची माहिती सामाजिक माध्यमांवर आणि आरोग्य विभागाकडे पोहोचल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेतली. त्यानंतर ९ जून रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायकर, तालुका आरोग्य अधिकारी राजू तडवी, आदिवासी प्रकल्प अधिकारी अरुण पवार, मोहराळा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक राजेंद्र महाजन, भरत महाजन यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांनी आरोग्य केंद्राला भेट दिली.

अधिकाऱ्यांनी प्रसूती झालेल्या महिलेची विचारपूस करून आरोग्य केंद्रातील परिस्थितीचा आढावा घेतला. चौकशीनंतर प्रसूतीच्या वेळी वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे नमूद करत संबंधित डॉक्टरांना नोटीसद्वारे समज देण्यात आली. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे समजते.

आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका काही तांत्रिक कारणांमुळे नादुरुस्त असल्याने संबंधित महिलेला घरपोच आरोग्य सेवा उपलब्ध करून देता आली नाही. तसेच प्रसूतीनंतर महिलेला दोन ते तीन दिवस आरोग्य केंद्रात राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र तिने स्वतःच्या इच्छेने तातडीने खाजगी वाहनाद्वारे घरी परतण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.

जामुनझिरा हा सातपुड्याच्या दुर्गम भागातील आदिवासी पाडा असून येथील नागरिकांना आरोग्य सेवांसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांची नियमित उपस्थिती, आवश्यक सुविधा आणि आपत्कालीन सेवा उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे.

या घटनेमुळे दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या असून, आदिवासी भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने अधिक प्रभावी पावले उचलण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

 


Protected Content

Play sound