Home Cities धरणगाव बाभुळगाव-सोनवद रस्ता मृत्यूचा सापळा; तातडीने डांबरीकरण करा, अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा

बाभुळगाव-सोनवद रस्ता मृत्यूचा सापळा; तातडीने डांबरीकरण करा, अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा

0
13


धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील बाभुळगाव ते सोनवद मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अवघ्या तीन किलोमीटर लांबीचा हा रस्ता गेल्या दोन वर्षांपासून खड्ड्यांनी विद्रूप झाला असून वाहनधारकांसाठी तो अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. या मार्गावरील अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात आता आंदोलनाची भूमिका घेतली जात आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, बाभुळगाव ते अहिरे दरम्यानचा रस्ता अनेक ठिकाणी पूर्णपणे उखडून गेला आहे. मोठमोठे खड्डे, पावसाळ्यात साचणारे पाणी आणि खराब झालेला डांबरी थर यामुळे दुचाकीस्वार, शालेय विद्यार्थी, शेतकरी आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दररोज या मार्गावरून हजारो नागरिकांची ये-जा होत असतानाही संबंधित विभागाकडून दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.

या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे गेल्या चार महिन्यांत एका २० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातानंतरही प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. वारंवार निवेदने, तक्रारी आणि मागण्या करूनही रस्त्याच्या दुरुस्तीबाबत कोणतीही सकारात्मक हालचाल दिसून येत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

या पार्श्वभूमीवर पत्रकार विकास पाटील यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. “बाभुळगाव-सोनवद रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करून नागरिकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी. अन्यथा संबंधित विभागाच्या निष्क्रियतेविरोधात आमरण उपोषण करण्यात येईल,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

रस्त्याच्या प्रश्नावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना नागरिकांनी प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. “एका निष्पाप तरुणाचा बळी जाऊनही अधिकाऱ्यांना जाग येत नसेल तर प्रशासन अजून किती जीव जाण्याची वाट पाहत आहे? नागरिकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणे ही गंभीर बाब आहे,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि वाहनधारकांनीही रस्त्याच्या प्रश्नावर एकवटत प्रशासनाने तातडीने निधी उपलब्ध करून दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी केली आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता असल्याने त्वरित उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

बाभुळगाव-सोनवद मार्ग हा परिसरातील महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग मानला जातो. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून डांबरीकरण करण्यात यावे, अन्यथा व्यापक लोकआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा नागरिकांसह पत्रकार विकास पाटील यांनी दिला आहे.


Protected Content

Play sound