जळगाव, प्रतिनिधी । मका पिकावरील लष्करी अळी, कापुस पिकावरील गुलाबी बोंडअळी व हुमणी अळी नियंत्रण आणि किटकनाशक हाताळणी नुकतीच विभागीय कृषि सहसंचालक, नाशिक यांचे अध्यक्षतेखाली कृषि विभागामार्फत एक दिवशीय विभागीय कार्यशाळा संपन्न झाली.
पहिल्या तांत्रिक सत्रात डॉ. सजीव पाटील, कापुस पैदासकर यांनी कापुस पिकावरील गुलाबी बोंड अळीची ओळख व जिवनक्रम तसेच बी. डी.जडे, शास्त्रज्ञ, जैन इरीगेशन यांनी गुलाबी बोंड अळीचे काढणी पश्चात व्यवस्थापन याबद्दल सादरीकरण करुन माहिती दिली. डॉ. हेमंत बाहेती, कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, ममुराबाद यांनी मका पिकावरील लष्करी अळीचे व्यवस्थापनचे सादरीकरण करुन माहिती दिली. अनिल भोकरे, कृषी उपसंचालक यांनी मका पिकावरील लष्करी अळीच्या नियंत्रणाबाबत कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मोहिमेची माहिती दिली. दुसऱ्या तांत्रिक सत्रात महेंद्र बावीसकर, ईको सिडस, हैद्राबाद यांनी मका पिकावरील एकात्मिक किड नियंत्रणबाबत सादरीकरण करुन लाईट ट्रॅपबाबत माहिती दिली. किशोर पाटोळे, निर्मल सिडस प्रा.लि. यांनी जैविक पध्दतीने मका पिकावरील लष्करी अळीचे नियंत्रणबाबत माहिती दिली. जागतीक अन्नधान्य दिन असल्याने डॉ. अनंत पाटील यांनी पौष्टीक तृणधान्याचे आहारातील महत्व पटवुन दिले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कावेरी राजपुत, तंत्र अधिकारी यांनी केले, सदर कार्यशाळेत शास्त्रज्ञ, कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी, बियाणे कंपनीचे प्रतिनिधी व शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी व अनिल भोकरे, कृषि उपसंचालक यांनी केले. त्यानंतर कृषि विभागामार्फत लष्कारी व गुलाबी बोंडअळीचे नियोजनाबाबत तयार करण्यात आलेल्या पुस्तिकीचे विमोचन करण्यात आले.
पडवळ, विभागीय कृषि सहसंचालक नाशिक व सचिन वानखेडे, विभागीय अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक यांनी कृषि विस्तार योजनांची माहिती देऊन शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले. शेवटी अनिल भोकरे, यांनी उपस्थिताचे आभार मानुन कार्यक्रम संपन्न झाल्याचे जाहिर केले.