पिशवी कापून वृध्दाची एक लाख रूपयांची रोकड लांबविली

जळगाव प्रतिनिधी । जळगाव पोस्ट ऑफीस कार्यालयात आलेल्या वृध्दाची पिशवी कापून एक लाख रूपयांची रोकड लांबविल्याची घटना आज सकाळी घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

 

याबाबत माहिती अशी की, मजूरी काम करणारे रामेश्वर कॉलनीत राहणारे देवराम बाबुराव चौधरी (वय-७२) हे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्यांचे जळगाव शहरातील मुख्य पोस्ट ऑफिस मध्ये बचत खाते काढले आहे. पोस्टाच्या खात्यात त्यांनी दीड लाख रूपयांची बचत केली होती. दरम्यान पोस्टात त्यांना व्याज कमी मिळत असल्याने त्यांनी पैसे काढून इतर बँकेत टाकण्याच्या विचारात होते. आज गुरूवारी २ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता नातवासोबत जळगाव शहरातील मुख्य पोस्ट कार्यालयात आले. यावेळी नातवाने भरणा स्लीप भरली आणि आजोबांनी पोस्टाच्या खात्यातून १ लाख रूपये काढले.

 

पैसे काढल्यानंतर पोस्टाच्या रोखपाल यांना पैश्यांचे बंडल मशिनमध्ये मोजून दाखवा असे सांगितले. त्यावर पैसे मोजण्याचे मशीन बंद असल्याचे सांगितले. त्यानुसार देवराम चौधरी यांनी पोस्ट कार्यालयातच बसून २० मिनीटे पैसे मोजत बसले होते. पैसे मोजून झाल्यानंतर त्यांनी पैसे सोबतच्या पिशवीत ठेवले आणि ते इतर बँकेत जाण्यासाठी निघाले. अज्ञात चोरट्याने त्यांच्या हातातील पिशवी कापून पिशवीतील १ लाख रूपयांची रोकड लांबविले. घटनेची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे आणि इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Protected Content