
जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहराने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाव उज्ज्वल केले आहे. जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे आंतरराष्ट्रीय पंच प्रवीण ठाकरे यांची प्रतिष्ठित विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेसाठी सामना पंच म्हणून निवड झाली आहे. जागतिक बुद्धिबळ संघटना (फिडे) आणि अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ (AICF) यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच गोवा शासनाच्या सहकार्याने आयोजित ही स्पर्धा दोन दशकांनंतर भारतात होत आहे. ३१ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर या कालावधीत गोव्यात हा बुद्धिबळ महोत्सव रंगणार आहे.
प्रवीण ठाकरे यांची ही नियुक्ती फिडेने अधिकृतरित्या जाहीर केली आहे. त्यांनी यापूर्वी राज्य, राष्ट्रीय, आशियाई आणि वर्ल्ड ज्युनियर पातळीवरील विविध स्पर्धांमध्ये पंच म्हणून काम पाहिले आहे. मात्र, या विश्वचषक स्पर्धेत नियुक्ती मिळवणारे ते उत्तर महाराष्ट्रातील पहिलेच बुद्धिबळ पंच ठरले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि अखिल भारतीय बुद्धिबळ संघाचे सल्लागार अशोक जैन तसेच सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष डॉ. परिणय फुके, कार्याध्यक्ष सिद्धार्थ मयूर, ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे, सचिव निरंजन गोडबोले यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन ठाकरे यांना लाभले. दर दोन वर्षांनी होणाऱ्या या बुद्धिबळ विश्वचषकात ८० हून अधिक देशांतील २०६ खेळाडू सहभागी होत असून, या स्पर्धेत बाद फेरी पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. त्यामुळे ही स्पर्धा उत्कंठावर्धक ठरणार आहे.
भारताकडून डी. गुकेश, प्रग्नानंदा, अर्जुन इरिगेसी, विदित गुजराथी, अरविंद चिदंबरम आणि दिव्या देशमुख हे आघाडीचे खेळाडू या स्पर्धेत उतरले आहेत. तर अनिश गिरी, वेस्ली सो, इयान नेपोमियाशी, लियोन आरोनियन, नोदरबेक अब्दुसत्तारोव यांसारखे जागतिक दर्जाचे दिग्गज खेळाडू देखील सहभागी होत आहेत.
अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ आणि गोवा शासनाने या सर्व आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू, प्रशिक्षक आणि पंच यांची उत्कृष्ट व्यवस्था केली आहे. या जागतिक प्रतिष्ठेच्या स्पर्धेत जळगावातील प्रवीण ठाकरे यांना पंच म्हणून संधी मिळणे ही केवळ त्यांच्या वैयक्तिक कर्तृत्वाची दखल नसून, संपूर्ण महाराष्ट्रातील बुद्धिबळप्रेमींसाठी अभिमानाची बाब आहे.
त्यांच्या या कामगिरीबद्दल जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव नंदलाल गादिया, उपाध्यक्ष फारुक शेख, अंजली कुलकर्णी, पद्माकर करणकर यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



