
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महानगरपालिकेकडून शहरातील विविध प्रभागांतील खराब व खड्डेमय रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असून, त्यासाठी प्रमुख रस्त्यांची यादी तयार करण्यात आली आहे. शहरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी मनपाने विविध भागांतील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते तसेच चौकांलगतच्या मार्गांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

मनपाने तयार केलेल्या यादीमध्ये प्रभाग क्रमांक १, २, ३, ४, ५, ६, ८, ९, ११, १२, १३, १४, १५, १६, १७, १८ आणि १९ मधील अनेक रस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. के.सी. पार्क अंतर्गत रस्ते, इंद्रप्रस्थ नगर, बहिणाबाई नगर, शिवाजी नगर उड्डाण पुलाखालील रस्ता, प्रशांत चौक ते उज्ज्वल चौक, बजरंग बोगदा परिसर, महादेव मंदिर ते स्मशानभूमी रस्ता, सुप्रीम कॉलनीतील रस्ते, एम.जे. कॉलेज ते प्रभात चौक मार्ग, मेहरूण पिंप्राळा शिव रोड, मोहोडी रोड, शामा फायर ते महादेव मंदिर या महत्त्वाच्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे.
याशिवाय पंचमुखी हनुमान मंदिर परिसर, आझाद रोड, कालंकामाता मंदिर परिसर, गणेशवाडी, रिंग रोड परिसरातील काही रस्त्यांचाही समावेश करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत होता. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून ही कामे तातडीने करण्याची मागणी नागरिकांकडून होत होती. यापार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे उद्या मंगळवार, २६ मे पासून रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.



