Home Cities मुक्ताईनगर उबाठाकडून रावेरमध्ये संघटनात्मक फेरबदल ; नव्या नियुक्त्यांची घोषणा

उबाठाकडून रावेरमध्ये संघटनात्मक फेरबदल ; नव्या नियुक्त्यांची घोषणा


मुक्ताईनगर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आगामी काळातील राजकीय आव्हाने आणि निवडणुकांचा वेध घेत शिवसेना उबाठाने जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघात आपल्या संघटनात्मक बांधणीला वेग दिला आहे. पक्ष संघटना तळागाळापर्यंत अधिक मजबूत आणि सक्रिय करण्याच्या उद्देशाने मतदारसंघात महत्त्वाच्या पदांवर नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पक्षाचे उपनेते तथा संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या थेट देखरेखीखाली या निवडी करण्यात आल्या आहेत. यामध्ये सामाजिक आणि संघटनात्मक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असणारे पक्षाचे खंदे कार्यकर्ते नितीन बळीराम गोसावी यांची रावेर ‘विधानसभा क्षेत्रप्रमुख तथा विधानसभा संघटक’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर दुसरीकडे, कायदेविषयक आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे ॲड. राहुल पाटील यांच्या खांद्यावर मुक्ताईनगर ‘तालुकाप्रमुख’ पदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी पक्षाची विचारधारा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवावी. सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन प्रश्नांना वाचा फोडून ते सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहावे, अशा सदिच्छा जिल्हाप्रमुख योगीराज पाटील यांनी यावेळी दिल्या. तसेच आगामी काळात पक्ष संघटना अधिक गतिमान करण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. या नव्या नियुक्त्यांमुळे रावेर लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिकांमध्ये नवा उत्साह संचारला असून, आगामी काळात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी या निवडी अत्यंत महत्त्वाच्या ठरतील, असा विश्वास राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.


Protected Content

Play sound