
अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर येथील मराठी वाङ्मय मंडळातर्फे प्रा. आप्पासाहेब र. का. केले ग्रंथालयाचा वर्धापन दिन आणि जागतिक रंगभूमी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सांस्कृतिक वारसा, नाट्यसंस्कृती आणि वाचनसंस्कार यांचा संगम घडविणारा हा कार्यक्रम मराठी साहित्यप्रेमी आणि रसिकांसाठी आनंदाचा सोहळा ठरला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. रजनीताई केले मॅडम होत्या. त्यांच्या हस्ते प्रा. आप्पासाहेब केले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर अखिल भारतीय नाट्य परिषदेचे सदस्य श्री. नाथा चितळे लिखित ‘बालनाट्यसंहिता’चे पूजन करून जागतिक रंगभूमी दिनाचे औचित्य साधले गेले.
या प्रसंगी बासरी साधक व प्रचारक योगेश पाटील यांनी सुमधुर बासरीवादन करून कार्यक्रमाला सुरेल वातावरण निर्माण केले. त्यांच्या सुरेल सादरीकरणाने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले.
कार्यक्रमात संदीप घोरपडे, नरेंद्र निकुंभ, भाऊसाहेब देशमुख, बन्सीलाल भागवत, विवेक भांडारकर, प्रा. यू. जी. देशपांडे, सौ. स्नेहा एकतारे आणि सौ. अरुणा विंचूरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्व वक्त्यांनी मराठी रंगभूमीची परंपरा, नाट्यसंस्कृतीचे महत्त्व आणि प्रा. आप्पासाहेब केले यांच्या ग्रंथालयाचे योगदान अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भैय्यासाहेब मगर यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. श्याम पवार यांनी केले. त्यांच्या प्रभावी सादरीकरणामुळे कार्यक्रम अधिक रंगतदार झाला.
या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून श्यामकांत भदाणे, अजय केले, सौ. विनिता केले, प्रा. डॉ. माहेश्वरी, प्रदीप साळवी, डॉ. रविंद्र कुलकर्णी, सौ. कांचन शहा, सोमनाथ ब्रह्मे, प्रा. विजय तुंटे, डॉ. महेश पाटील, ॲड. के. व्ही. कुलकर्णी, अनिल सोनार, दिनेश नाईक, हनुमंत पाटील, ग्रंथपाल हेमंत बाळापूरे आणि जगदीश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमास मराठी वाङ्मय मंडळाचे पदाधिकारी, संचालक, ग्रंथालयाचे सभासद, वाचक आणि रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीने मराठी संस्कृती, वाचन आणि रंगभूमीचा गौरव अधिक वृद्धिंगत झाला.
हा कार्यक्रम म्हणजे मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेरच्या सांस्कृतिक वाटचालीतील आणखी एक उज्ज्वल पर्व ठरला असून, प्रा. आप्पासाहेब केले यांच्या स्मृतींना अभिवादन करत मराठी साहित्यातील परंपरेला नवचैतन्य देणारा ठरला.



