
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मराठी रंगभूमीचा वैभवशाली वारसा साजरा करण्यासाठी आज, दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ रोजी जळगावच्या बालगंधर्व खुले नाट्यगृहात रंगकर्मी मोठ्या उत्साहात एकत्र आले. मराठी रंगभूमी दिनानिमित्त रंगकर्मींच्या उपस्थितीत रंगदेवता नटराज, तबला, पेटी आणि रंगरंगोटी पेटी (मेकअप बॉक्स) पूजनाचा सोहळा पार पडला. ज्येष्ठ रंगकर्मी श्री. चिंतामण पाटील (मास्तर) यांनी नारळ फोडून कार्यक्रमाचा शुभारंभ केला आणि रंगदेवतेस वंदन करण्यात आले.
या प्रसंगी डॉ. उल्हास कडूस्कर लिखित “शब्द-सुरांच्या रेशीम गाठी” या नाटकातील नांदीचे सादरीकरण खान्देश नाट्य प्रतिष्ठानचे कलाकार दुष्यंत जोशी आणि संजय कुलकर्णी यांनी गायले. त्यांच्या सुमधुर सादरीकरणास तबल्यावर मोहन रावतोळे आणि संवादिनीवर भूषण खैरनार यांनी अप्रतिम साथसंगत दिली. नांदीच्या गाण्याने संपूर्ण सभागृहात एक भक्तिभावाचा आणि कलाभावाचा माहोल निर्माण झाला.
या प्रसंगी जेष्ठ रंगकर्मी पीयुष रावळ, विनय काबरा, संजय निकुंभ, चंद्रकांत अत्रे, गुलाब शेख, चंद्रकांत चौधरी, अरुण सानप, शरद पांडे, विनोद ढगे, अनिल मोरे, जगदीश नेवे, तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळ सदस्या गीतांजली ठाकरे हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात सुभाष मराठे, शरद भालेराव, आकाश बाविस्कर, प्रदीप भोई, अविनाश चव्हाण, भगवंत फडणीस, महेंद्र खेडकर, पवन खंबायत, बळवंत गायकवाड, नेहा पवार, शुभदा नेवे, मानसी नेवे, धनंजय राजहंस, अविनाश मोघे, विजय पाठक, प्रा. सुधीर भटकर, योगेश शुक्ल, बोरसे दादा, गणेश सोनार, सचिन महाजन, सुभाष गोपाळ, नितीन तायडे, सुदर्शन पाटील, ज्ञानेश्वर पाटील, तुषार वाघुळदे आणि अमोल ठाकूर यांच्यासह सर्व रंगकर्मी एकत्र येऊन मराठी रंगभूमीला अभिवादन केले.
रंगभूमी दिनाच्या निमित्ताने मराठी नाट्यकलेच्या गौरवशाली इतिहासाचा उल्लेख करत सर्वांनी रंगदेवतेस वंदन केले आणि भविष्यात मराठी रंगभूमी अधिक संपन्न होण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचा संकल्प केला. कलाकारांच्या या आत्मीय उपस्थितीने बालगंधर्व नाट्यगृहात उत्सवाचा माहोल निर्माण झाला.
रंगकर्मींच्या या सामूहिक उपक्रमाने मराठी रंगभूमी दिनाला नवा अर्थ प्राप्त झाला असून, जळगाव शहराने पुन्हा एकदा सांस्कृतिक सर्जनशीलतेचा झेंडा उंचावला आहे.



