
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चित्रपट निर्मिती, दिग्दर्शन आणि अभिनयाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास घराघरांत पोहोचवणारे प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांना यंदाचा ‘स्व. शिवशाहीर दादा नेवे’ पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘श्री शिवरत्न प्रतिष्ठान, जळगाव’ या संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे हे दुसरे वर्ष असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर कार्य करणाऱ्या आणि समाज प्रबोधन करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष जयवर्धन नेवे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

हा भव्य पुरस्कार सोहळा ४ जून रोजी गुरुवार या दिवशी शहरातील भाऊसाहेब गांधी हॉल येथे सायंकाळी ७ वाजता होणार आहे. एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे या गौरवशाली पुरस्काराचे स्वरूप आहे. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून नागपूरचे मुधोजी राजे भोसले तसेच राजमाता जिजाऊंचे वंशज श्री शिवाजीराजे जाधव यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
त्यांच्यासोबतच जैन समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, जळगाव पीपल्स बँकेचे माजी चेअरमन भालचंद्र पाटील, आमदार राजूमामा भोळे, महापौर दीपमाला काळे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अशोक शिंदे आणि ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर प्रमुख उपस्थित राहणार आहेत. या दिमाखदार सोहळ्याला जळगाव शहरातील सर्व शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री शिवरत्न प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवर्धन नेवे, उपाध्यक्ष निरंजन देशमुख, खजिनदार स्वप्नील नेवे आणि सर्व सदस्यांनी केले आहे.



