किशोर सूर्यवंशीची ‘इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंद; गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगकडून होणार सन्मान


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगावच्या युवकाने किडनी ट्रान्सप्लांटनंतरही जीवन नव्या उर्जेने जगत अवयवदानाचा संदेश देत संपूर्ण देशाला प्रेरणा दिली आहे. जळगावचे किशोर सूर्यवंशी यांची सलग १० तासांच्या गायनाची अनोखी कामगिरी नुकतीच ‘इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंदवली गेली आहे. या उल्लेखनीय विक्रमामुळे किशोर सूर्यवंशी हे जगातील पहिले व्यक्ती ठरले असून, त्यांच्या या कामगिरीचा शहरभरातून गौरव केला जात आहे.

किशोर सूर्यवंशी यांनी अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी ५ एप्रिल २०२५ रोजी सलग १० तास गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. किडनी ट्रान्सप्लांट झाल्यानंतरही त्यांनी हा विलक्षण उपक्रम राबवून सर्वांसमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवले. ‘ट्रान्सप्लांटनंतर जीवन थांबत नाही, तर नव्या उत्साहाने फुलते,’ हा संदेश त्यांनी आपल्या प्रयत्नातून दिला.

या उपक्रमाची नोंद ‘इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झाल्याने जळगावकरांचा अभिमान वाढला आहे. किशोर सूर्यवंशी यांना या बाबतचे सन्मानपत्र आणि प्रमाणपत्र नुकतेच प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर ऑगस्ट २०२५ मध्ये जर्मनी येथे झालेल्या ‘वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्स’ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत त्यांनी देशासाठी रौप्यपदकही जिंकले होते.

त्यांच्या या अद्वितीय यशाचा गौरव करण्यासाठी गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग तर्फे ७ नोव्हेंबर रोजी जळगावमध्ये विशेष सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला आहे. शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत किशोर सूर्यवंशी यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

किशोर सूर्यवंशी यांची ही कहाणी केवळ वैयक्तिक यशाची नाही, तर अवयवदान, सकारात्मक जीवनदृष्टी आणि प्रेरणादायी धैर्याचे प्रतीक बनली आहे.