अभी काशी…मथुरा बाकी है : विनय कटियार !

लखनऊ वृत्तसंस्था । अयोध्येतील राम मंदिराचा मार्ग मोकळा झाला असला तरी अद्याप काशी आणि मथुरा मंदिराचा वाद भाजपच्या अजेंड्यावर असल्याची माहिती या पक्षाचे खासदार विनय कटियार यांनी आज दिली आहे. यामुळे आता भाजप या दोन्ही ठिकाणी लक्ष वळवण्याचे संकेत मिळाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राममंदिराचे भूमीपूजन पाच ऑगस्टला होत आहे. त्यामुळे मंदिर उभारणीच्या कामाला वेग येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्‍वभूमिवर, आज भाजपचे खासदार तथा राम जन्मभूमि आंदोलनातील एक प्रमुख नेते विनय कटियार यांनी आऊटलूक नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत आता पक्षाचे पुढील उद्दीष्ट्य काय असेल ? याबाबतचे सूतोवाच केले आहे. अयोध्येतील मंदिर पूर्ण होत असताना काशी आणि मथुरा हे तुमच्या कार्यक्रम पत्रिकेत कायम आहेत का? असा प्रश्‍न त्यांना विचारला होता. त्यावेळी ते म्हणाले की, काशी आणि मथुरेत मंदिर उभारणी हे विषय आमच्या कार्यक्रम पत्रिकेत आहेतच. आम्ही बसून त्यावर चर्चा करून आमचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असे ते म्हणाले.

कटियार पुढे म्हणाले की, काशी, मथुरा आणि अयोध्या या तीन पवित्र स्थळांना परत द्यावे, ही आमची मागणी कायम आहे. अयोध्येची मागणी पूर्ण झाली आता काशी विश्‍वनाथ अणि कृष्णजन्मभूमीसाठी प्रयत्न करावे लागतील. पक्षात याबाबत चर्चा झाली असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. या परिसरातील मशिदींना प्रार्थनास्थळे कायदा १९९१ अन्वये संरक्षण आहे. पण मशीद तर तेथून हटवलीच पाहिजे. वाट पाहा आणि काय होते ते पहा, असे ते म्हणाले.

याप्रसंगी विनय कटियार पुढे म्हणाले की, रामजन्मभूमी मंदिराची चळवळ भाजपाच्या नेतृत्वाखाली झाली. आता अयोध्येनंतर हे दोन विषय आमच्या रडारवर आहेत. या दोन्ही ठिकाणचे न्यायलयीन खटले अलाहाबाद उच्च न्यायलयात प्रलंबीत आहेत, याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, आम्ही ते पुढे आणण्याचे प्रयत्न करु.

Protected Content