प्रत्येक गावाला कोरोनामुक्त ठेवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न- संजय सावंत (Video)

जळगाव प्रतिनिधी – राज्यातील प्रत्येक गावाला कोरोनामुक्त ठेवण्यासाठी शिवसैनिक प्रयत्न करणार असून यासाठी माझा गाव कोरोनामुक्त गाव हे अभियान राबविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी केले. तर शिवसैनिक तसेच पदाधिकार्‍यांनी पक्षाचा विचार शेवटचा घटकापर्यंत नेण्याचा प्रयत्न करावा. त्यांचे कार्य हे पक्षाला बळकटी प्रदान करणारे असावे असे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते शिवसंपर्क अभियानाच्या कार्यान्वयनासाठी आयोजीत करण्यात आलेल्या नियोजन बैठकीत बोलत होते. याप्रसंगी त्यांनी पक्षात भानगडी लावणार्‍यांपासून सावध राहण्याचे आवाहन करत जे अंगावर येतील त्यांना शिंगावर घेण्याचा इशारा देखील दिला.

मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच राज्यात १२ ते २४ जुलैच्या दरम्यान शिवसंपर्क अभियान आणि माझा गाव कोरोनामुक्त गाव हे दोन उपक्रम राबविण्याची घोषणा केली होती. या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यात हे दोन्ही उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार आहेत. याच्या नियोजनासाठी आज अजिंठा शासकीय विश्रामगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले. याला पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, संपर्क प्रमुख संजय सावंत, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या बैठकीत जळगाव शहर, जळगाव ग्रामीण व अमळनेर विधानसभा मतदारसंघात शिवसंपर्क अभियान तसेच माझा गाव कोरोनामुक्त गाव या मोहिमा राबविण्याबाबत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, शिवसेनेचा विचार शेवटचा घटकापर्यंत पोहचवण्यासाठी या मोहिमा उपयुक्त ठरणार आहेत. यात शिवसैनिकांची नोंदणी करावी. याच्या जोडीला आपल्या गावाला कोरोनामुक्त ठेवण्याचे प्रयत्न करावेत. तसेच कोरोनामुक्तीसाठी प्रयत्न करणार्‍यांचा सत्कार देखील करण्यात यावा असे ना. गुलाबराव पाटील म्हणाले.

दरम्यान, ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी काही जण पक्षात एकमेकांविषयी मने कलुषीत करण्याचे प्रयत्न करत आहेत. अशा भानगडी लावणार्‍यांपासून सर्वांनी सावध रहावे. मात्र कुणी अंगावर येण्याचा प्रयत्न केला तर त्याला अंगावर घ्यावे असे स्पष्ट प्रतिपादन ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

याप्रसंगी संपर्क प्रमुख संजय सावंत म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचीत्य साधून जिल्ह्यात शिवसंपर्क अभियान व माझा गाव कोरोनामुक्त गाव या मोहिमा राबविण्यात येत आहेत. या अभियानाच्या नियोजनासाठी आज बैठक घेण्यात आली. सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या नियमांचे पालन करून जिल्ह्यात या दोन्ही मोहिमा राबविण्यात येणार आहे. यात प्रत्येक गावाला कोरोनामुक्त ठेवण्यासाठी शिवसैनिक प्रयत्न करणार आहेत. यासाठी प्रत्येक गावात कार्य करण्यात येणार आहेत. तर शिवसंपर्क अभियानात शिवसैनिकांची नोंदणी करणार असल्याची माहिती संजय सावंत यांनी याप्रसंगी दिली.

याप्रसंगी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णुभाऊ भंगाळे, महापौर जयश्रीताई महाजन, महानगर प्रमुख शरद तायडे, उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी महापौर नितीन लड्डा, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, तालुका प्रमुख विजय पाटील, राजेंद्र चव्हाण विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, गोपाल चौधरी, प्रतापराव पाटील, पं. स . सभापती ललिता पाटील,प्रेमराज पाटील तसेच महिला आघाडीच्या शोभा चौधरी, सरिता माळी, ज्योती शिवदे, मंगला बारी यांच्यासह जळगांव मनपाचे व धरणगावचे नगरसेवक उपस्थित होते. अमळनेर, जळगांव ग्रामीण व जळगांव शहर विधानसभा मतदार संघातील शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

मेळाव्याचे प्रस्ताविक तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण यांनी केले सूत्रसंचालन विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर यांनी केले तर आभार महानगरप्रमुख शरद तायडे यांनी मानले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!