गिरीश महाजन व उन्मेष पाटलांसोबतचे सुनील झंवर यांचे फोटो व्हायरल

जळगाव प्रतिनिधी । एकीकडे बीएचआर घोटाळ्याच्या चौकशीला वेग येत असतांना आता दुसरीकडे भाजपचे नेते गिरीश महाजन व उन्मेष पाटील यांच्यासोबतचे त्यांचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले असून यावर तुफान चर्वण होऊ लागले आहे.

बीएचआर गैरव्यवहार प्रकरणी आता सुनील झंवर यांच्या भोवतीचा पाश आवळला जात असतांना त्यांच्या राजकीय लागेबांध्यांबाबत चर्चा सुरू झाली आहे. झंवर हे माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यांच्याच मंत्रीपदाच्या कालावधीत झंवर यांना अनेक शासकीय कामे मिळाली होती. बीएचआर प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून सुनील झंवर यांचे नाव समोर आल्याने आता त्यांचे राजकीय कनेक्शन देखील चर्चेत आले आहे.

सुनील झंवर हे प्रत्यक्ष राजकारणात नसले तरी त्यांचे अतिशय वरिष्ठ नेत्यांपर्यंतचे संबंध होते. यामुळे त्यांच्यावर करण्यात आलेली कारवाई ही प्रत्यक्षात गिरीश महाजन यांच्यावर आघात असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या पार्श्‍वभूमिवर आता सोशल मीडियात सुनील झंवर यांचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत.

जळगाव येथील माल धक्का हा धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे स्थलांतरी करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. यासाठी गिरीश महाजन व उन्मेष पाटील यांनी ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेतली होती. याप्रसंगी या दोन्ही मान्यवरांसोबत सुनील झंवर यांचीही उपस्थिती होती. यामुळे झंवर हे भाजप नेत्यांच्या खास मर्जीतले असल्याचे दिसून आले होते. आता तेच फोटो नव्याने सोशल मीडियात विरोधकांनी शेअर केले असून यावर तुफान चर्वण सुरू आहे. दरम्यान, याबाबत अद्यापही भाजप नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.

तर, दुसरीकडे आज माजी मंत्री एकनाथराव खडसे हे सायंकाळी पत्रकार परिषद घेणार असून यात ते नेमका काय गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content