दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला अण्णा हजारे यांचा पाठिंबा

दिल्‍ली वृत्तसंस्था । शेतकरी विधेयक कायद्याच्या विरोधात दिल्ली व हरियाणाच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठिंबा दिला असल्याचे रविवारी सांगितले. या पाश्र्वभूमीवर हजारे यांना विचारले असता त्यांनी आंदोलकांना पाठिंबा देत केंद्र सरकारला लक्ष्य केले.

कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांवर वारंवार आंदोलने करण्याची वेळ येते हे दुर्दैवी असल्याचे सांगतानाच आंदोलक शेतकरी पाकिस्तानातून आले आहेत का, ते आपल्या देशातीलच आहेत. एकत्र बसून त्यांच्या प्रश्नावर तोडगा काढला पाहिजे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले. या वेळी त्यांनी शेतकरी आंदोलनास पाठिंबा दिला.

हजारे म्हणाले, निवडणुकीच्या काळात तुम्ही शेतकऱ्यांच्या शेतावर, त्याच्या घरी मत मागण्यासाठी गेला आहात. तसेच आता हे आंदोलन सुरू झाल्यानंतर सरकार व शेतकरी यांनी एकत्र बसून चर्चा करायला हवी होती. अद्याप शेतकऱ्यांचे आंदोलन शांततेत सुरू आहे. शेतकरी हिंसेसाठी मजबूर झाले तर त्यास जबाबदार कोण, असा सवाल हजारे यांनी केला.

शेतकरी हिंसा करणार नाहीत असा मला विश्वास आहे. इतके दिवस आंदोलन सुरू आहे तरीही शेतकऱ्यांनी हिंसा होऊ दिली नाही. मी असे ऐकले आहे की, शेतकऱ्यांच्या अंगावर पाण्याचे फवारे सोडण्यात आले आहेत. त्यात एक शेतकरी मृत्युमुखी पडला. ही गोष्ट आपल्या देशासाठी अजिबात योग्य नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करा, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करुन त्यानंतर निर्णय घेतला पाहिजे.

Protected Content