डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजात धुडगुस घालणार्‍यांच्या विरोधात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । डॉ. उल्हास पाटील Dr. Ulhas Patilमेडिकल कॉलेज आणि हॉस्पीटलमधील कोविड वॉर्डात धुडगुस घालणार्‍यांच्या विरोधात नशिराबाद पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

डॉ. उल्हास पाटील Dr. Ulhas Patil मेडिकल कॉलेज आणि हॉस्पीटलमध्ये काही दिवसांपूर्वी कोविड वॉर्डात एका जमावाने धुडगुस घालून याबाबतचा व्हिडीओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल केला होता. या संदर्भात कॉलेजततर्फे कोविड वॉर्डात कार्यरत असणारे वॉर्डबॉय मयूर पंडित पवार (रा. केसरनगर, जामनेर रोड, भुसावळ) यांनी नशिराबाद पोलीस स्थानकात फिर्याद दिली.

या फिर्यादीत नमूद केले आहे की, दिनांक १९ मार्च रोजी सायंकाळी ६.४० वाजेच्या सुमारास सचिन सुखराम कोळी (वय ३३) हा कोरोना बाधित रुग्ण उपचारासाठी डॉ.उल्हास पाटील Dr. Ulhas Patil कोविड रुग्णालयात दाखल झाला होता. रुग्णालयात दाखल करतेवेळी केलेल्या तपासणीत त्याच्या शरीरातील ऑक्सीजनची पातळी ५० ते ५५ अशी असल्यामुळे त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. त्याला पुढील उपचारासाठी अति दक्षता विभागात दाखल करण्यासाठी नातेवाईकांनी विनंती केली होती. त्यानुसार त्याला आयसीयू म्हणजे अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, आयसीयूमध्ये उपचार सुरू असतांना दि. २१ रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास सचिन कोळी या रुग्णाचा मृत्यू झाला. यावेळी रुग्णाचे मावस भाऊ पंकज कोळी व सोनू कोळी दोघे रा.साकेगाव यांनी रुग्णाची भेट घ्यायची असल्याचे सांगितले. त्यावेळी वॉर्डबॉय मयूर पवार यांनी एका नातेवाईकास मध्ये घेऊन जातो असे सांगितलं. त्याचा राग येऊन पंकज व सोनू कोळी या दोघांनी मयूर पवार यास धक्काबुक्की करीत चापटांनी मारहाण केली. तसेच अतिदक्षता विभागाचा काचेचा दरवाजा फोडून आत प्रवेश केला. यावेळी दोघांनी आरडाओरड करून शिवीगाळी देखील केली.

यामुळे अतिदक्षता विभागात डयुटीवर असलेले नर्सिंग व डॉक्टर स्टाफ हे घाबरून दुसर्‍या रूम मध्ये निघून गेले. या दोघांसह रुग्णाच्या १० ते १२ नातेवाईकांनी देखील लोखंडी गेटला लाथा मारून मोठा गोंधळ घातला. या घटनेची माहिती रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी आशिष भिरूड यांच्यासह व्यवस्थापनाला देण्यात आली. दरम्यान मयत रुग्णाचा मृतदेह सकाळी ९ वाजता नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

याप्रकरणी रुग्णालयात तोडफोड करून दहशत माजविण्याच्या कारणावरून पंकज कोळी व सोनू कोळी यांच्यासह अज्ञात जमावाच्या विरुद्ध मयूर पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात कलम ४५२, १४३, १४७, ३२३, ५०४, ४२७, १८८, महाराष्ट्र वैद्यकीय सेवा, व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था अधिनियम २०१० अंतर्गत कलाम ४, साथीचे रोग अधिनियम १८९७ अंतर्गत २ (ब), ३ (२), ३७ (१)(३), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.का. शांताराम तळेले करीत आहेत.

दरम्यान, या संदर्भात डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, कोविडच्या आपत्तीत अनेक रूग्ण हे अगदी चिंताजनक स्थितीत दाखल होत असून आम्ही रूग्णांच्या आप्तांना त्यांच्या स्थितीची खरी माहिती देऊन उपचार करत असतो. प्रत्येक रूग्णाचा प्राण वाचविणे हेच आमचे ध्येय आहे. यात आम्ही जरा देखील कसूर करत नाही. मात्र हॉस्पीटलच्या आवारात कुणी कायद्याला हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

Protected Content