फुल पिक लागवडीत येणार्‍या तांत्रिक समस्या सोडवा : खा. पाटील

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | फुल पीक लागवडीकरिता ऑनलाइन प्रणाली मध्ये मोठी तांत्रिक अडचण निर्माण झालेली आहे. ही समस्या गंभीर असून याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी खासदार उन्मेषदादा पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, खासदार उन्मेषदादा पाटील यांनी राज्य सरकारकडे निवेदन सादर केले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की शेतकर्‍यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असलेली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये यापूर्वी फळबाग लागवडीचा समावेश होता. तसेच सदरील योजनेत फुल पिकांच्या लागवडीचा देखील समावेश व्हावा याबाबतचे मागणी आम्ही वेळोवेळी केली होती व त्या अनुषंगाने दि.७ डिसेंबर २०२० च्या मा.आयुक्त (कृषि) महाराष्ट्र राज्य यांच्या पत्रानुसार कृषी विभागामार्फत वैयक्तिक लाभार्थ्यांना सलग शेतावर गुलाब, निशिगंधा व मोगरा या फुल पिकांची लागवड करण्यास मान्यता देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने वरील पत्रामध्ये सदरील पिकाचे अंदाजपत्रक देखील निश्चित करण्यात आले होते. फुलपीक लागवडीकरिता ऑनलाइन प्रणाली मध्ये मोठी तांत्रिक अडचण निर्माण झालेली आहे. ही समस्या गंभीर असून याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

दरम्यान, याबाबत खासदार उन्मेषदादा पाटील यांनी राज्य सरकारकडे वस्तुस्थिती लक्षात आणून देत निवेदनात पुढे म्हटले आहे क्षेत्रीय स्तरावर माझ्या मतदारसंघातील मुख्यतः शिरसोली व परिसरातील शेतकर्‍यांसोबत चर्चा करत असताना असे निदर्शनास आले आहे की फुल पीक लागवडीकरिता ऑनलाइन प्रणाली मध्ये मोठी तांत्रिक अडचण निर्माण झालेली आहे. ज्यामुळे मागील वर्षी देखील एकाही शेतकर्‍याला या योजनेचा लाभ मिळाला नाही. याबाबतची सविस्तर माहिती तपासून पाहिली असता ऑनलाइन प्रणालीमध्ये कामाचा कोड (उदा. फळ पिकाचा ज्या पद्धतीने ऑनलाईन वर्क कोड) असतो तसा कामाचा कोड फुल पिकांचा नसल्याने शेतकर्‍यांना या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. ही बाब गंभीर आहे.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, तात्काळ संबंधित विभागास सूचना देऊन फुल पीक लागवडीचा कामाचा कोड समावेश होईल या दृष्टीने आदेशित करावे व शेतकर्‍यांची अडचण दूर करावी. अशी मागणी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी राज्याच्या सचिवांकडे केली असून अशा आशयाचे पत्र मा.आयुक्त (नरेगा), नागपूर ,मा.आयुक्त (कृषि) यांना माहिती व पुढील कार्यवाही साठी सादर केले आहेत.

Protected Content