जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथे जुन्या वादातून दोन गटात झालेल्या भीषण हाणामारीत कुऱ्हाड आणि लोखंडी रॉडचा मुक्त वापर करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात एका तरुणाच्या डोक्यात कुऱ्हाड लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथील रहिवासी फारुख शेख गफ्फार (वय ३२) हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत. ९ मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास तोंडापूर येथील अहमदनगर भागात हा प्रकार घडला. फारुख यांचा भाऊ मुस्ताक शेख गफ्फार याला संशयित आरोपी चांदखाँ गणीखाँ, नाजीमखाँ नासीरखाँ चांदखाँ, मेहरुनबी चांदखाँ यांनी मागील भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर लवकरच हाणामारीत झाले.

मुस्ताक याला लोखंडी रॉडने चेहऱ्यावर, मानेवर आणि पाठीवर बेदम मारहाण केली. यावेळी काही आरोपींनी दगडफेक आणि लाथाबुक्क्यांचाही वापर केला. जेव्हा फिर्यादी फारुख शेख हे मध्यस्थी करण्यासाठी आणि भांडण सोडवण्यासाठी गेले, तेव्हा त्यांच्यावरही प्राणघातक हल्ला करण्यात आला. आरोपींपैकी एकाने हातातील कुऱ्हाडीने फारुख यांच्या डोक्यात वार केला, ज्यामुळे ते रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झाले. “आमच्या नादी लागलात तर तुम्हाला सोडणार नाही,” अशी धमकी देत आरोपींनी तेथून पळ काढला. याप्रकरणी पहूर पोलिसांनी चांदखाँ गणीखाँ, नाजीमखाँ नासीरखाँ चांदखाँ, मेहरुनबी चांदखाँ यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास सपोनि प्रमोद कठोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ दिपक सरवाडे करत आहेत.



