विद्यापीठात बिबट्याचा वावर : निवासी अभियंत्याला झाले दर्शन !

जळगाव प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे आज स्पष्ट झाले असून निवासी अभियंत्याला सायंकाळी बिबट्याचे दर्शन घडले आहे. या संदर्भात वन खात्याने बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वनराई असल्यामुळे येथे वन्य प्राण्यांचा वावर असल्याचे आधी देखील आढळून आले आहे. यापूर्वी काही वेळेस येथे बिबट्याच्या खुणा देखील आढळल्या होत्या. या पार्श्‍वभूमिवर, आज विद्यापीठाचे निवासी अभियंता राजेश पाटील यांना आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले आहे.

राजेश पाटील हे पाच वाजेच्या सुमारास आपल्या कुटुंबासह हनुमंतखोरेकडे जाणार्‍या रस्त्यावरून जात असतांना त्यांना बिबट्या दिसला. क्षणार्धात हा बिबट्या झाडीमध्ये निघून गेला. या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूजला दिलेल्या माहितीमध्ये अभियंता राजेश पाटील यांनी आपल्या कुटुंबाला बिबट्याचे दर्शन घडल्याची माहिती दिली. या संदर्भात आपण वन खात्याला माहिती देणार असून विद्यापीठाच्या परिसरातील बिबट्याला पकडण्याची मागणी करणार असल्याचेही ते म्हणाले.

Protected Content