महापौर व उपमहापौरांनी केले वाघूर धरणाचे जलपूजन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहराचा पाणीपुरवठा होत असलेल्या वाघूर धरणात समाधानकारक जलसाठा असल्याने महापालिकेतर्फे महापौर जयश्री महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या उपस्थितीत एका दाम्पत्याने जलपूजन केले. तर महापौर व उपमहापौरांनी नारळ अर्पण केले.

याबाबत वृत्त असे की, जळगाव शहरात वाघूर धरणावरून पाणी पुरवठा होत असून गेल्या काही दिवसांपर्यंत धरणातील पाण्याच्या प्रमाणात वाढ झालेली नव्हती. मात्र काही दिवसांपूर्वी पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे धरण पूर्ण भरण्याच्या मार्गावर असून यातून पाण्याचा विसर्ग देखील सुरू करण्यात आलेला आहे. यामुळे जळगावकरांची तहान भागणार असून आगामी उन्हाळ्यातही पाणी टंचाईचे सावट नसेल हे स्पष्ट झाले आहे.

या पार्श्‍वभूमिवर, महापौर सौ. जयश्री सुनील महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या उपस्थितीत वाघूर धरणाचे जलपूजन करण्यात आले. युवराज तांबे आणि त्यांच्या सौभाग्यवती यांनी जळगावकरांच्या वतीने वाघूर धरणाची पूजा केली. तर महापौर आणि उपमहापौरांनी नारळ अर्पण करून वाघूर धरणाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

याप्रसंगी महापौरांनी वाघूर धरण हे जळगावकरांसाठी महत्वाचे असून याच्याच मदतीने जळगावकरांची तहान भागत असल्याचे सांगितले. यात चांगला पाणीसाठा असेल तर सध्या दोन दिवसाआड होणारा पाणी पुरवठा हा एका दिवसाआड होईल असा आशावाद व्यक्त केला.

याप्रसंगी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, शिवसेनेचे माजी महानगराध्यक्ष गजानन मालपुरे, ललीत धांडे, मुकेश पाटील आदींची उपस्थिती होती.

Protected Content