जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये, संस्कार आणि जीवनातील सकारात्मक विचारांची जाणीव निर्माण करणारे नाट्यरंग जळगाव निर्मित लोकप्रिय बालनाट्य ‘गाठोड्याचं गुपित’ याचा २८ वा प्रयोग शिरसोली येथील पद्मालय इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला. संस्थेच्या वतीने हा प्रयोग विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे विनामूल्य आयोजित करण्यात आला होता. शाळेतील सुमारे ७०० विद्यार्थ्यांनी या प्रयोगाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत नाटकाचा मनमुराद आनंद घेतला.
‘गाठोड्याचं गुपित’ हे बालनाट्य केवळ मनोरंजनापुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या कोवळ्या मनावर चांगल्या संस्कारांची बीजे रुजवणारे प्रभावी माध्यम ठरत आहे. जीवनातील नैतिक मूल्ये, आत्मपरीक्षण, प्रामाणिकपणा आणि सकारात्मक विचार यांचा प्रभावी संदेश या नाटकातून दिला जातो. विचारप्रवर्तक कथानक, हृदयस्पर्शी सादरीकरण आणि मुलांना सहज समजेल अशा शैलीमुळे हे नाटक विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांच्याही पसंतीस उतरले आहे.

राज्यस्तरीय विविध नाट्यस्पर्धांमध्ये अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आलेल्या या बालनाट्याचे लेखन आणि दिग्दर्शन नाट्यरंग जळगाव संस्थेचे संचालक अमोल अरुण ठाकूर यांनी केले आहे. दर्जेदार आशय, प्रभावी अभिनय आणि सामाजिक मूल्यांचा संदेश यामुळे या नाटकाचा यशस्वी प्रवास सातत्याने सुरू असून, शिरसोलीतील २८ वा प्रयोगही विद्यार्थ्यांच्या भरघोस प्रतिसादामुळे संस्मरणीय ठरला. या प्रयोगात प्रभूदत्त दुसाने आणि राशी पडलवार या प्रतिभावान बालकलावंतांनी आपल्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांच्या अभिनयाला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. नाटकाची रंगमंच व्यवस्था प्रणित जाधव, पीयूष भुक्तार, प्रणव जाधव, अथर्व रंधे आणि दिशा ठाकूर यांनी यशस्वीपणे सांभाळत प्रयोग अधिक प्रभावी केला.
हा प्रयोग विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी संस्थेचे संचालक निषादराज रंगराव बारी आणि अध्यक्षा श्रीमती भारती रंगराव बारी यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती चौधरी यांनी संपूर्ण नाट्यसंघाचे मनःपूर्वक कौतुक करत विद्यार्थ्यांसाठी अशा संस्कारक्षम उपक्रमांची गरज अधोरेखित केली. यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्कार, मनोरंजन आणि शिक्षण यांचा सुंदर संगम घडविणारे ‘गाठोड्याचं गुपित’ हे बालनाट्य विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी माध्यम ठरत असून, शिरसोली येथील यशस्वी प्रयोगामुळे या नाट्यप्रवासाला आणखी एक संस्मरणीय टप्पा लाभला आहे.



