Home प्रशासन तहसील स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त यावल तहसील कार्यालयात प्रतिमा भेट 

स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त यावल तहसील कार्यालयात प्रतिमा भेट 

0
14

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाने सन २०२६ पासून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीचा शासकीय कार्यक्रमांमध्ये समावेश केला आहे. त्यानुसार २२ जुलै २०२६ रोजी राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये अजित पवार यांची जयंती साजरी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, रावेर लोकसभा जिल्ह्याच्या वतीने यावल तहसील कार्यालयात स्व. अजित पवार यांची प्रतिमा भेट देण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाने यावल तहसील कार्यालयात नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे यांची भेट घेत स्वर्गीय अजितदादा पवार यांची आकर्षक प्रतिमा त्यांना सुपूर्द केली. यावेळी शासनाच्या निर्णयाची माहिती देत २२ जुलै रोजी तहसील कार्यालयासह सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये प्रतिमेचे पूजन करून स्व. अजित पवार यांच्या कार्याला अभिवादन करण्यात यावे, अशी विनंती करण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे यांनी प्रतिनिधी मंडळाचे स्वागत केले. तसेच शासनाच्या निर्देशानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

स्वर्गीय अजित पवार यांनी आपल्या राजकीय व सामाजिक जीवनात प्रशासन, विकासकामे, शेतकरी हित, युवकांसाठीच्या योजना, शिक्षण, सहकार क्षेत्र, ग्रामीण विकास आणि जनकल्याणाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले. त्यांच्या कार्याचा आदर्श नवीन पिढीने घ्यावा आणि लोकहिताच्या कामांसाठी त्यांच्या विचारांतून प्रेरणा मिळावी, अशी भावना व्यक्त करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृती चिरंतन राहण्यासाठी सामाजिक, शैक्षणिक आणि जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

या प्रतिनिधी मंडळात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राकेश सोनार, ॲड. देवकांत पाटील, यावल शहर कार्याध्यक्ष कदीर खान आणि विद्यार्थी शहराध्यक्ष प्रेमजी देवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था तसेच सामाजिक संघटनांनी २२ जुलै रोजी स्वर्गीय अजित अनंतराव पवार यांची जयंती उत्साहात साजरी करून त्यांच्या कार्याला अभिवादन करावे, असे आवाहन करण्यात आले.


Protected Content

Play sound