ब्रँड बाळासाहेब ठाकरे : ज्येष्ठ पत्रकार विक्रांत पाटलांचे दणदणीत भाष्य

आजचा संपूर्ण दिवस नारायण राणे यांची अटक आणि नंतर शिवसेना विरूध्द भाजप या सामन्याने रंगला. याचे अनेकांनी आपापल्या परीने विश्‍लेषण केले आहे. मात्र ज्येष्ठ पत्रकार विक्रांत पाटील यांनी खास आपल्या रोखठोक शैलीत या संपूर्ण घटनेचे केलेले राजकीय भाष्य आपल्यासाठी सादर करत आहोत.

उद्या भलेही नारायण राणेंना जामीन होईल, भलेही पुढे प्रकरणात काही दम राहणार नाही; मात्र एकूणच आजच्या घडामोडींनी शिवसैनिकात नवा जोश, नवा उत्साह आणि नवी उर्मी दिसली. बाळासाहेबांची आक्रमक शिवसेना आज खूप दिवसांनी दिसली. शिवसेनेत नव्याने आलेले हे उत्साहाचे तुफान मुंबई महापालिका निवडणुकीत नक्कीच फायद्याचे ठरणार आहे. कोण चूक, कोण बरोबर ही सारी चर्चा झडत राहील; पण आज मराठी माणूस मनोमन खुश आहे. आज “लोकल”मध्येही, मुंबईत जागोजागी मराठी माणूस “जोरात” होता, टशन देत होता. कारण मराठी माणसाला शिवसेना ही अशीच आवडते – आक्रमक, अंगावर आलेल्याला शिंगावर घेणारी! आणि खरे सांगायचे तर शिवसेना तशीच आहे, तशीच राहील.

शिवसैनिकांच्या भाषेत सांगायचे तर, गेले अनेक दिवस “फडफड करणारे” राणे आज जाम ठेचले गेले. राणेंची दोन्ही पोरे गायब आहेत आज, त्यांचा आवाज नाही काही. सरदेसायांच्या वरुणने थेट राणेंच्या बालेकिल्ल्यात जाऊन दंड थोपटले…. राणेंची पुरती जिरली, जिरविली गेली. व्वा … बाळासाहेबांची शिवसेना दिसली आज – चांद्यापासून बांद्यापर्यंत. उद्धव ठाकरे हे तसे शांत आणि संयमी नेतृत्व. करोना काळात त्यांनी ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली, त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच. त्यांच्या समजूतदारपणापुढे राणे, फडणवीस, च.पा., शेलार आदींचा आक्रस्ताळेपणा नकोसा वाटतो. राणे पातळी सोडून बोलले तरी उद्धव काही व्यक्त झाले नाहीत. यापूर्वीही वेळोवेळी आक्रस्ताळे भाजप नेते बरळत असताना ते शांत राहिले. त्यातून त्यांचीच वैचारिक उंची वाढली. इतरजण मात्र अधिकच वैफल्यग्रस्त होत गेले. त्यांचे खुजेपण संपूर्ण राज्याला आज एका नजरेत जाणवते. आज राणेंची मस्ती जिरत असताना उद्धव कुठेही दिसले नाही. सारं कार्य जणू शिवसैनिकांनी हाती घेतले होते. ना उद्धव दिसले ना उद्धव यांचे संजय!

काय वाटतं तुम्हाला? कोण असेल या पटकथेचा लेखक? काही अंदाज बांधता येतोय का? मी मात्र 100% खात्रीने सांगू शकतो, की ज्यांनी मोठे “ठाकरे” अगदी जवळून पाहिले आहेत, ज्यांना त्यांची लेखणी अक्षरश: त्याच आक्रमकतेने अवगत आहे, ज्यांनी रुपेरी पडद्यावर “ठाकरे” समर्थपणे उभे केले, तोच लेखक यामागे असावा. येऱ्या-गबाळ्याचे काम नोहे! सौ सुनारकी आणि एक लोहारकी, असा हा मजबूत ठाकरी दणका आहे. शिवसेनेविरोधात मचमच करणाऱ्यांना हा एक मस्त “धडा” ठरणार आहे. यातलं चूक-बरोबर, नैतिक-अनैतिक हे सारं बाजूला ठेवूयात; त्या चर्चा होत राहतील, त्याचे विश्लेषण होत राहील. एक नक्की, आज सामान्य मुंबईकर खुश आहे, आज कोकणी माणूस खुश आहे, आज मराठी माणूस खुश आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सामान्य शिवसैनिक तर जाम खुश आहे. त्याला स्फुरण चढणे तो विसरला होता, त्याचे बाहू फुरफुरणे तो विसरला होता, शड्डू ठोकून मैदानात उभा ठाकायला तो विसरला होता, अंगावर आलेल्याला शिंगावर घ्यायला तो विसरला होता. आज काही तासात हे चित्र बदलले. शिवसैनिकात, पक्षात एक जबरदस्त ऊर्जा आज संचारली आहे. ती पक्षाला नवी ताकद देईल. उद्धव ठाकरे हे नेतृत्व किती हुशार आहे, हे आज साऱ्या देशाला कळून चुकले.

नुसतं तोंडाची वाफ दवडून उपयोग नाही. मौन राहूनही खूप काही करता येते. उद्धव आणि त्यांच्या चाणक्यांना आज मनापासून सलाम ठोकावासा वाटतो. आज स्वर्गात बाळासाहेबांनाही सारा वृत्तांत पुरविणारा कुणी संजय असेल, तर बाळासाहेबही खुश असतील. काय नाही दिलं त्यांनी नारायण राणेंना? पण पदाचा राणेंना इतका माज आला की, ते जुने दिवस विसरले. ज्या पक्षाने मान-सन्मान मिळवून दिले, त्याचे उपकार विसरले, वाट्टेल ते बरळले. अगदी आमचे गुलाबराव पाटील म्हणतात तसे, ठाण्याला जाऊन तपासणी करावी, इतपत खालच्या थराला जाऊन बरळले. ते तर कुणाही सभ्य माणसाला पटणारे नाही. बाकी, कायद्याचा वापर-गैरवापर, लोकशाहीची हत्या वैगेरे चर्चेत आपल्याला पडायचे नाही. ती जोरात होऊ द्या. त्यासाठी फडणवीस, च.पा., शेलार, सांबित वात्रा आदी भरपूर विद्वान आहेत. तसेही ती लोकशाहीची हत्या कधी नव्हे ती महाराष्ट्रात झाली असेलही पण भगव्या ठोकशाहीत ती देशात रोज कुठे ना कुठे होत असते. कुठे इडी, कुठे सीडी, कुठे सीबीआय, कुठे पेगासिस, कुठे काय न कुठे काय …. ते सुरूच असते. आता इतरही तसे करू शकतात, करू लागले तर कुणी फार पतिव्रता असल्याचा आव आणू नये. मगरीचे अश्रू ढाळून कुणी रडू लागले तर देशाची आन, बान आणि शान असलेल्या तिरंगा ध्वजाला, ज्याची अस्मिता राखण्यासाठी भगतसिंह यांच्यासह हजारो क्रांतिकारी शहीद झाले, त्या ध्वजाला दुय्यम स्थान देऊन पक्ष ध्वज वर लावताना कुठे गेली होती, लोकशाही मूल्यांची शिकवण, हा प्रश्न जरूर विचारा.
तूर्तास ….

आवाज कुणाचा $$ शिवसेनेचा!!!
आला रे आला, कोण आला …. शिवसेनेचा वाघ आला!!!!

विक्रांत पाटील

(लेखक हे ज्येष्ठ पत्रकार असून आपल्या जबरदस्त आक्रमक व सडेतोड लिखाणशैलीसाठी विख्यात आहेत.)

Protected Content