Home Cities मुक्ताईनगर जळगावातील कुपोषणाचा मुद्दा विधानपरिषदेत ; खडसेंच्या प्रश्नावर सरकारचा कुपोषण घटल्याचा दावा ...

जळगावातील कुपोषणाचा मुद्दा विधानपरिषदेत ; खडसेंच्या प्रश्नावर सरकारचा कुपोषण घटल्याचा दावा   

0
13

 मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव जिल्ह्यातील कुपोषित बालकांच्या स्थितीचा मुद्दा विधानपरिषदेत गाजला असून, आमदार एकनाथ खडसे यांनी या विषयावर सरकारचे लक्ष वेधले आहे. जिल्ह्यातील कुपोषणाची सद्यस्थिती, कुपोषित बालकांची संख्या आणि शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लेखी उत्तर देत जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण कमी झाल्याचा दावा केला आहे.

आमदार एकनाथ खडसे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नात महिला व बालविकास विभागाच्या सर्वेक्षणाचा उल्लेख करण्यात आला. या सर्वेक्षणानुसार जळगाव जिल्ह्यात २,०४८ बालके कमी वजनाची असून ३,८१४ बालके तीव्र कुपोषित (SAM) श्रेणीत असल्याचे निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने कोणत्या उपाययोजना राबवल्या आहेत, याबाबत त्यांनी विधानपरिषदेत माहिती मागितली. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले की, ‘पोषण ट्रॅकर’ प्रणालीद्वारे बालकांची उंची आणि वजनाची नियमित नोंद घेतली जाते. या नोंदींच्या आधारे बालकांच्या पोषणस्थितीचे वर्गीकरण केले जाते. शासनाच्या आकडेवारीनुसार मार्च २०२५ मध्ये जळगाव जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण ०.३९ टक्के होते. ते मार्च २०२६ मध्ये घटून ०.३१ टक्क्यांवर आल्याचा दावा करण्यात आला आहे.

कुपोषणावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी शासन विविध योजनांची अंमलबजावणी करत असल्याचेही उत्तरात नमूद करण्यात आले आहे. सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील बालके, गरोदर महिला आणि स्तनदा मातांना ‘टेक होम रेशन’ (THR) योजनेअंतर्गत पोषक आहार दिला जात आहे. तसेच तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना अंगणवाडी केंद्रांवर गरम व ताजा आहार उपलब्ध करून दिला जात आहे. याशिवाय तीव्र कुपोषित बालकांसाठी ‘एनर्जी डेन्स न्यूट्रिशिअस फूड’ उपलब्ध करून देण्यात येत असून, ‘पोषण अभियान’ अंतर्गत बालकांच्या आयुष्यातील पहिले सुवर्णमयी १००० दिवस या महत्त्वाच्या कालावधीबाबत पालकांमध्ये जनजागृती केली जात असल्याचेही शासनाने स्पष्ट केले आहे.


Protected Content

Play sound