Home प्रशासन तहसील डोंबिवलीतील डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेध ; आयएमएकडून रावेर तहसीलदारांना निवेदन 

डोंबिवलीतील डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेध ; आयएमएकडून रावेर तहसीलदारांना निवेदन 

0
19

रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि परिचारिकांवर झालेल्या कथित मारहाण व शिवीगाळ प्रकरणाचा रावेर-यावल-सावदा-फैजपूर तापी व्हॅली इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) शाखेने तीव्र निषेध नोंदविला आहे. या घटनेच्या निषेधार्थ आयएमएच्या पदाधिकाऱ्यांनी काळ्या फिती बांधून रावेर तहसीलदारांना निवेदन सादर करत दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.

डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयात नगरसेवक रमेश म्हात्रे, त्यांच्यासोबत असलेल्या काही व्यक्ती तसेच रुग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्टर व परिचारिकांना कथितरित्या शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली असून राज्यभरातील विविध आयएमए शाखांकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर रावेर-यावल-सावदा-फैजपूर तापी व्हॅली आयएमए शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी काळ्या फिती बांधून रावेर तहसील कार्यालयात मोर्चा काढत तहसीलदार दीपा जेधे यांना निवेदन सादर केले. या निवेदनात डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांविरुद्ध कोणतीही दयामाया न दाखवता कठोर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, दोषींना कडक शिक्षा व्हावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी विद्यमान कायद्याची प्रभावी व कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली.

तहसीलदार दीपा जेधे यांनी आयएमएचे निवेदन स्वीकारले. यावेळी आयएमएचे अध्यक्ष डॉ. संदीप पाटील, सचिव डॉ. सुचिता कुयते, डॉ. मिलिंद वानखेडे, डॉ. संध्या वानखेडे यांच्यासह आयएमए शाखेचे सर्व सदस्य उपस्थित होते. उपस्थित डॉक्टरांनी आरोग्यसेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही व्यक्त केली. डॉक्टरांनी सांगितले की, रुग्णसेवा ही अत्यंत संवेदनशील आणि जबाबदारीची सेवा असून डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले केवळ वैद्यकीय क्षेत्रासाठीच नव्हे, तर संपूर्ण आरोग्य व्यवस्थेसाठी चिंतेची बाब आहे. अशा घटनांमुळे डॉक्टरांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत असून त्याचा परिणाम आरोग्यसेवेवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


Protected Content

Play sound