सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील चिनावल येथील निर्मल युवराज महाजन (वय २७) या तरुणाने स्वत:वर गोळी झाडून आपले जीवन संपविल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ६ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री निर्मल याला गंभीर जखमी अवस्थेत त्याच्या नातेवाईकांनी सावदा येथील ग्रामीण रुग्णालयात आणले होते. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. मयताच्या उजव्या डोळ्याजवळ ६ एम.एम. आकाराचे गोलाकार छिद्र (जखम) आढळून आले आहे. या जखमेमुळे तरूणाचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून सावदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची (अ.मृ. क्र. २२/२०२६) नोंद करण्यात आली आहे. ही नोंद बीएनएसएस (BNSS) कलम १९४ अन्वये करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.



