भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ३१ जुलै २०२६ रोजी झालेल्या ढगफुटीसदृश पावसासह शिवणी येथील जामदा कालवा फुटल्याने भडगाव तालुक्यातील वडजी सजा अंतर्गत अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे होऊनही अद्याप नुकसानभरपाई मिळाली नसल्याचा आरोप करत शेतकरी आक्रमक झाले आहेत. पंचनामे आणि नुकसानभरपाईच्या प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप करत अखिल भारतीय मराठा महासंघाने प्रशासनाकडे संबंधित तलाठ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
या संदर्भात अखिल भारतीय मराठा महासंघाचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रदीप भिकनराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली भडगाव तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात वडजी सजा अंतर्गत महसूल विभागाच्या कामकाजावर गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. प्रत्यक्षात पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. वडजी सजेतील संबंधित तलाठ्यांनी प्रत्यक्ष नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची नावे वगळून, ज्या व्यक्तींच्या शेतात पिकांचे नुकसान झालेले नव्हते, अशा व्यक्तींची नावे नुकसानभरपाईच्या यादीत समाविष्ट केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे खऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय झाला असून, शासनाच्या मदतीच्या वितरण प्रक्रियेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे महासंघाने म्हटले आहे.

तलाठ्यांच्या कथित चुकीच्या व बेजबाबदार कारभारामुळे पात्र शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी किंवा चौकशीसाठी शेतकरी कार्यालयात गेल्यानंतर त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांमध्ये प्रशासनाच्या कारभाराविरोधात नाराजी वाढत असल्याचे महासंघाने म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित तलाठी सौ. वैशाली वाघ यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी प्रमुख मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पंचनामे, नुकसानभरपाईची यादी आणि प्रत्यक्ष शेतातील नुकसानीची वस्तुस्थिती यांची तपासणी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रशासनाला या प्रकरणी आठ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. या कालावधीत संबंधित तलाठ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई न झाल्यास बाधित शेतकरी भडगाव तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडतील, असा स्पष्ट इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाने दिला आहे. त्यामुळे प्रशासन या तक्रारींची कशा पद्धतीने दखल घेते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष प्रदीप भिकनराव पाटील यांच्यासह जिल्हा सरचिटणीस जगदीश शिंदे, जिल्हा संघटक पपेश पाटील, शेतकरी बाबाजी भाऊराव पाटील, विजय पाटील, रावसाहेब पाटील, सचिन सुभाष पाटील आणि भरत विठ्ठल परदेशी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, जळगाव जिल्हाधिकारी तसेच पाचोरा प्रांत अधिकारी यांनाही माहितीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.



