Home क्राईम जुगार खेळणाऱ्यांना पोलिसांचा दणका! घोडसगावात सहा जणांवर कारवाई

जुगार खेळणाऱ्यांना पोलिसांचा दणका! घोडसगावात सहा जणांवर कारवाई

0
19

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । घोडसगाव शिवारातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ लगत हॉटेल संस्कृतीच्या पाठीमागे सुरू असलेल्या पत्त्यांच्या जुगार अड्ड्यावर मुक्ताईनगर पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून रोख रकमेसह पत्त्यांचे चार कॅट असा एकूण ४४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता घोडसगाव शिवारात हॉटेल संस्कृतीच्या पाठीमागील मोकळ्या जागेत हिरव्या रंगाच्या नेटखाली काही जण पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिस पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला.

कारवाईदरम्यान पोलिसांना सहा जण पत्त्यांच्या जुगारात सहभागी असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम तसेच जुगारासाठी वापरण्यात येणारे पत्त्यांचे चार कॅट असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये संदीप श्यामराव गाठे (३६, रा. अवखाना जयसिंगपुरा, ता. जि. बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश), पवन राजू तायडे (२३, रा. अवखाना जयसिंगपुरा, ता. जि. बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश), राजेश भिकाजी सुरंगे (३२, रा. श्रीरामनगर, मुक्ताईनगर), आकाश अशोक सावळे (२१, रा. संबोधिनगर, मुक्ताईनगर), नितीन संजय इंगळे (२२, रा. घोडसगाव, ता. मुक्ताईनगर) आणि किरण काशिनाथ कोळी (४२, रा. आठवडेबाजार जुनेगाव, मुक्ताईनगर) यांचा समावेश आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरून मिळालेली रोकड आणि आरोपींच्या अंगझडतीतून मिळालेली रक्कम अशी एकूण ४४ हजार ७०० रुपये, तसेच पत्त्यांचे चार कॅट जप्त केल्याची माहिती आहे.

या प्रकरणी पोलीस अंमलदार गजानन दत्तू जाधव यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार पोहेकॉ चंद्रकांत बोडदे पुढील तपास करीत आहेत.

घोडसगाव शिवारात सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर झालेल्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध जुगाराविरोधात पोलिसांनी कडक भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे.


Protected Content

Play sound