Home क्राईम विहिरीत उलटे लटकवून दिव्यांगाचा छळ; धक्कादायक व्हिडिओप्रकरणी दोघांना अटक

विहिरीत उलटे लटकवून दिव्यांगाचा छळ; धक्कादायक व्हिडिओप्रकरणी दोघांना अटक

0
10

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील दहिगाव येथे ५० वर्षीय दिव्यांग व्यक्तीला विहिरीत उलटे लटकवून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा मोबाईलमध्ये व्हिडिओ तयार करून तो व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याप्रकरणी यावल पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली असून, तिसरा संशयित फरार आहे.

याबाबत दहिगावच्या पाटील गल्लीतील रहिवासी नामदेव रामदास पाटील (वय ५०) यांनी यावल पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, २८ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे दीड ते दोन वाजण्याच्या दरम्यान दहिगावपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर नावरा रस्त्यालगत वेडू शंकर पाटील यांच्या मालकीच्या विहिरीजवळ हा प्रकार घडला.

 

तक्रारीत नमूद केल्यानुसार, नितीन उर्फ मुन्ना सुनील पाटील (वय २३) आणि पंकज उर्फ झग्या संतोष पाटील (वय २२), दोघेही रा. दहिगाव, यांनी नामदेव पाटील यांचे दोन्ही पाय पकडून त्यांना सुमारे १५ मिनिटे विहिरीत उलटे लटकवले. त्यानंतर त्यांना कपडे काढण्यास भाग पाडून मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या घटनेवेळी दोन्ही संशयितांसोबत असलेल्या एका अनोळखी साथीदाराने मोबाईलमध्ये संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ तयार केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. विहिरीत उलटे लटकविलेल्या अवस्थेत पाय निसटल्यास संबंधित व्यक्ती विहिरीत पडून गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता होती, तरीही संशयितांनी हे कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारदार दिव्यांग असल्याची माहिती संशयितांना असतानाही त्यांची टिंगलटवाळी करण्याच्या आणि घाबरविण्याच्या उद्देशाने हा प्रकार करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करून बदनामी केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी नामदेव पाटील यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात संबंधित संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नितीन पाटील आणि पंकज पाटील यांना अटक केली असून, घटनेचा व्हिडिओ तयार करणाऱ्या तिसऱ्या संशयिताचा शोध सुरू आहे.

घटनेमुळे दहिगावसह यावल तालुक्यात संतापाची लाट निर्माण झाली असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे तपास करीत आहेत.


Protected Content

Play sound