Home प्रशासन तहसील आठवडाभरात पीकविम्याची रक्कम खात्यात जमा करा, अन्यथा रास्ता रोको ! ; शेतकऱ्यांचा...

आठवडाभरात पीकविम्याची रक्कम खात्यात जमा करा, अन्यथा रास्ता रोको ! ; शेतकऱ्यांचा आक्रमक इशारा

0
36

रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । केळी पीकविम्याची प्रलंबित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न होणे आणि विमा पोर्टलवर वगळलेले क्षेत्र पूर्ववत करण्याऐवजी कमी क्षेत्रच कायम ठेवल्याने रावेर तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. या प्रश्नावर सोमवारी (दि. १६ नोव्हेंबर) असंख्य शेतकऱ्यांनी रावेर तहसील कार्यालयावर धडक देत तहसीलदार संजय तायडे यांना निवेदन दिले. येत्या आठवडाभरात पीकविम्याची रक्कम खात्यात जमा न झाल्यास २५ नोव्हेंबर रोजी रावेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. तसेच जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी या प्रकरणात थेट लक्ष घालून प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणीही करण्यात आली.

गेल्या तीन महिन्यांपासून जळगाव जिल्ह्यातील केळी पट्ट्यात पीकविम्याचा प्रश्न चर्चेचा विषय बनला आहे. आधीच वादळामुळे केळी पिकाचे नुकसान सहन करावे लागलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळण्याची अपेक्षा पीकविम्याच्या रकमेकडून आहे. मात्र, विमा कंपनीकडून वारंवार वेगवेगळी आश्वासने दिली जात असल्याने शेतकरी संभ्रमात असून, प्रत्यक्षात रक्कम खात्यात जमा होत नसल्याने त्यांची चिंता वाढली आहे. यापूर्वी ६ नोव्हेंबर रोजी जळगाव येथे केळी उत्पादक शेतकऱ्यांनी पीकविम्याच्या प्रश्नावर आंदोलन केले होते. त्यावेळी विभागीय अधिकारी सोमेश देशमुख यांनी २० नोव्हेंबरपर्यंत पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याबाबत आश्वासन दिले होते. तसेच विमा प्रक्रियेतून वगळण्यात आलेले केळी पिकाचे क्षेत्र पूर्ववत करून त्यानुसार विम्याची रक्कम देण्याबाबतही त्यांनी शेतकऱ्यांना शब्द दिला होता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात आशा निर्माण झाली होती.

मात्र, १४ नोव्हेंबर रोजी विमा पोर्टलवर उपलब्ध झालेल्या माहितीत पूर्वीप्रमाणेच कमी केलेले आणि वगळलेले क्षेत्र कायम असल्याचे दिसून आले. त्यामुळे अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नसल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली. क्षेत्र पूर्ववत न करता विम्याची प्रक्रिया पुढे नेली जात असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न सुटत नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला. सोमवारी रावेर तहसील कार्यालयात मोठ्या संख्येने एकत्र आलेल्या शेतकऱ्यांनी तहसीलदार संजय तायडे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. पीकविम्याची रक्कम आठवडाभरात खात्यात जमा करावी, वगळलेले क्षेत्र पूर्ववत करावे आणि या संपूर्ण प्रकरणात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. हे शेवटचे निवेदन असून, यानंतरही प्रश्न मार्गी न लागल्यास २५ नोव्हेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको करण्यात येईल, असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला.

विशेष म्हणजे, रास्ता रोको आंदोलनादरम्यान पीकविम्याची रक्कम खात्यात जमा झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्धारही शेतकऱ्यांनी व्यक्त केला. त्यामुळे तहसील कार्यालय परिसरात काही काळ घोषणाबाजीने वातावरण तापले होते. शेतकऱ्यांच्या या भूमिकेमुळे पीकविमा प्रश्नावर प्रशासन आणि विमा कंपनीसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. दरम्यान, तहसीलदार संजय तायडे यांनी शेतकऱ्यांसमोरच पीकविमा कंपनीचे मुंबई येथील प्रतिनिधी श्री. झनकर आणि नाशिक विभागीय प्रमुख सोमेश देशमुख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांकडूनही प्रतिसाद मिळाला नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नावर संबंधित अधिकाऱ्यांनी संपर्कालाही प्रतिसाद देऊ नये, ही बाब संतापजनक असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती समज देण्यात यावी, अशी तक्रारही शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे केली.

शेतकऱ्यांच्या वाढत्या रोषाची गंभीर दखल घेत तहसीलदार संजय तायडे यांनी संपूर्ण प्रकाराची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवली. तसेच विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याबाबत तंबी दिल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातही संकेत पाटील यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी याच मागण्यांसंदर्भात निवेदन सादर केले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून या प्रकरणात काय भूमिका घेतली जाते, याकडे केळी उत्पादकांचे लक्ष लागले आहे. या आंदोलनावेळी शेतकरी सुनील कोंडे यांच्यासह रावेर बाजार समितीचे माजी सभापती सचिन पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वाय. एस. महाजन, रामदास लहासे, दिलीप पाटील, विकास महाजन, मधुकर पाटील, संजय पवार, अशोक भिरुड, गोपाळ बऱ्हाटे, चेतन सांगळे, रत्नाकर महाजन, योगेश पाटील, पंकज पाटील, रवींद्र चौधरी, मोहन बोंडे, डिगंबर नेहेते, सोपान पाटील, शुभम पाटील आदींसह असंख्य शेतकरी उपस्थित होते.


Protected Content

Play sound