Home क्राईम चाळीसगावात अवैध गुटखा तस्करीप्रकरणी पाच आरोपी अटकेत ; ६.५७ लाखांचा मुद्देमाल जप्त

चाळीसगावात अवैध गुटखा तस्करीप्रकरणी पाच आरोपी अटकेत ; ६.५७ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
9

चाळीसगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहर पोलिसांनी अवैध गुटखा तस्करीविरोधात धडक कारवाई करत पाच आरोपींना अटक केली असून, महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधित पानमसाला, सुगंधित तंबाखू तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कार असा एकूण ६ लाख ५७ हजार ७८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे चाळीसगावातील अवैध तंबाखूजन्य पदार्थांच्या तस्करीला मोठा आळा बसल्याचे मानले जात आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना अवैध धंद्यांविरोधात कठोर व प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अमितकुमार मनेळ हे अवैध धंद्यांबाबत गोपनीय माहिती संकलित करीत असताना ८ जुलै २०२६ रोजी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. त्यानुसार हनुमानवाडी परिसर, बलभीम व्यायामशाळेजवळ, आनंदवाडी येथील जुना डिझेल गॅरेज परिसर तसेच बसस्थानकाच्या मागील लक्ष्मीनगर भागात काही व्यक्ती प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याची अवैधरित्या वाहतूक करून विक्रीसाठी साठवणूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा केल्यानंतर प्रभारी अधिकारी अमितकुमार मनेळ यांनी विशेष पथक तयार करून अत्यंत गोपनीय पद्धतीने सापळा रचला. या कारवाईत अजित चांदूमल रावलानी, कुबेर शेख कसम, हितेश किशोर पवार, निखिल राजेंद्र केसरवाणी आणि सौरभ संजय शिंगणे (सर्व रा. चाळीसगाव) यांना ताब्यात घेण्यात आले.

आरोपींच्या ताब्यातील ट्रॅव्हल बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखू मोठ्या प्रमाणात आढळून आला. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पंचनामा करून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान प्रतिबंधित गुटखा, सुगंधित पानमसाला, तंबाखूजन्य पदार्थ तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली टाटा इंडिका (क्रमांक MH-18-W-7837) ही कार असा एकूण ६,५७,०७८ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. प्राथमिक तपासात हा प्रतिबंधित माल मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथून चाळीसगावात तस्करी करून आणण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून, या रॅकेटमधील इतर संबंधितांचा शोध सुरू आहे. पुढील तपास चाळीसगाव शहर पोलीस करीत आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पानमसाला व तत्सम तंबाखूजन्य पदार्थांची खरेदी, विक्री, साठवणूक किंवा वाहतूक करणे हा कायद्याने गुन्हा आहे. अशा अवैध व्यवसायांबाबत माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ, पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले, पोलीस कॉन्स्टेबल मोहन सूर्यवंशी, अशोक मोरे आणि कल्पेश पगारे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.


Protected Content

Play sound