Home क्राईम प्रेमसंबंधाला विरोध केल्याच्या वादातून तरुणाने घेतला टोकाचा निर्णय ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रेमसंबंधाला विरोध केल्याच्या वादातून तरुणाने घेतला टोकाचा निर्णय ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

0
9

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मावस बहिणीच्या प्रेमसंबंधाला विरोध केल्याच्या कारणावरून तरुणाला वारंवार धमकावून त्रास दिल्याचा आरोप असून, या त्रासाला कंटाळलेल्या २८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जळगाव शहर परिसरात समोर आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून, मृत तरुणाच्या नातेवाईकांनी संबंधित संशयितांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

प्रशांत संजय सोनवणे (वय २८, रा. देऊळवाडा, ता. जि. जळगाव, सध्या जैनाबाद परिसरात वास्तव्यास) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, प्रशांतच्या मावस बहिणीचे संदीप महाजन याच्यासोबत प्रेमसंबंध होते. या संबंधांना प्रशांतचा विरोध असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. प्रेमसंबंधाला विरोध केल्याच्या कारणावरून संदीप महाजन, विशाल महाजन तसेच त्यांच्या आईकडून प्रशांतला वारंवार अडवून धमकावले जात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकारामुळे प्रशांत मानसिक त्रासात असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अखेर ६ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास प्रशांतचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली.

घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. प्रशांतला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेनंतर रुग्णालय परिसरात नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती. प्रशांतच्या नातेवाईकांनी या प्रकरणातील संशयितांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित दोघांना अटक करण्याची मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली. धमक्या आणि त्रासाच्या आरोपांची पोलिसांनी गांभीर्याने चौकशी करावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.

या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात दोन जणांच्या तक्रारीवरून संदीप महाजन, विशाल महाजन आणि त्यांच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. घटनेमागील नेमकी परिस्थिती, यापूर्वी प्रशांतला धमक्या किंवा त्रास देण्यात आला होता का, तसेच या प्रकरणातील इतर बाबींचा पोलीस तपास सुरू आहे. पोलिसांकडून तक्रारीतील आरोपांची पडताळणी करण्यात येत असून, तपासातून पुढील तथ्य समोर येणार आहे. या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांकडून होत आहे.


Protected Content

Play sound