मुंबई इंडियंसचा कोलकातावर दणदणीत विजय

अबुधाबी – आयपीएलच्या 13 व्या सत्राचा 5 वा सामना कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) आणि मुंबई इंडियन्स (एमआय) यांच्यात अबुधाबी झाला. या सामन्यात मुंबईने कोलकातावर दणदणीत विजय मिळवला आहे.

कोलकाताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईने 20 ओव्हरमध्ये कोलकाताला 196 धावांचे टार्गेट दिले आहे. परंतू, कोलकाता फक्त 146 धावांची मजल मारू शकला. प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर क्विंटन डी कॉक दुसऱ्याच षटकात १ धाव काढून माघारी परतला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी धुलाई केली. सूर्यकुमार यादवचं अर्धशतक अवघ्या तीन धावांनी हुकलं. त्याने २८ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकार खेचत ४७ धावा केल्या. सौरभ तिवारी याने २१ धावा केल्या. कर्णधारपदाला साजेशी खेळी करणारा रोहित शर्मा ८० धावांवर बाद झाला. ५४ चेंडूंच्या खेळीत त्याने ३ चौकार आणि ६ षटकार लगावले. त्याच्या फटकेबाजीच्या बळावर मुंबईने १९५ धावांपर्यंत मजल मारली.

१९६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर शुभमन गिल (७) आणि सुनील नारायण (९) स्वस्तात बाद झाले. कर्णधार दिनेश कार्तिक आणि धडाकेबाज फलंदाज नितीश राणा यांनी कोलकाताचा सावरला आणि सामन्यातील आव्हान जिवंत ठेवलं. पण राहुल चहरने कार्तिकला पायचीत पकडले. कार्तिकने २३ चेंडूत ५ चौकारांसह ३० धावा केल्या. कार्तिकपाठोपाठ खेळपट्टीवर स्थिरावलेला नितीश राणादेखील (२४) बाद झाला. मुंबईचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराह याने आंद्रे रसल (११) आणि इयन मॉर्गन (१६) यांना एकाच षटकात माघारी धाडले. यंदाच्या लिलावात सर्वात महागडा ठरलेला खेळाडू पॅट कमिन्स याने जसप्रीत बुमराहला चांगलाच चोप दिला. त्याने एकाच षटकात बुमराहला चार षटकार लगावले. १२ चेंडूत ४ षटकारांसह ३३ धावांची तडाखेबाज खेळी करणारा पॅट कमिन्स फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. त्यामुळे मुंबईला ४९ धावांनी विजय मिळवला.

Protected Content