चेन्नईकडून पंजाबचा धुव्वा; गडी न गमावता मिळवला विजय !

दुबई-आयपीएलच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने किंग्ज इलेव्हन पंजाबला 10 गडी राखून पराभूत केले. यापूर्वी चेन्नईला सलग तीन सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या सामन्यात मात्र चेन्नईने दहा गडी राखून दणदणीत विजय संपादन केला आहे.

आयपीएलच्या 13 व्या सत्रातील 18 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने किंग्स इलेव्हन पंजाबचा 10 विकेट्सनी दारुण पराभव केला. या सत्रात पहिल्यांदाच एखादा संघ दुबई धावांचा पाठलाग करताना जिंकला आहे. याआधी या मैदानावर 7 सामने झाले. हे सर्व सामने प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला होता. किंग्ज इलेव्हन पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबचे फॉर्ममध्ये असलेले सलामीवीर केएल. राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी ८ षटकात संघाला ६० धावांपर्यंत पोहचवले. पण, पियुष चावलाने मयांकला २६ धावांवर बाद करत ही जोडी फोडली.

त्यानंतर राहुल आणि मनदीप सिंगने दुसऱ्या विकेटसाठी भागिदारी रचण्याचा प्रयत्न केला पण, जडेजाने मनदीपला २७ धावांवर बाद करत पंजाबच्या धावगतीला ब्रेक लावला. दरम्यान, केएल राहुलने अर्धशतक ठोकत संघाला १५ षटकात १३० धावांपर्यंत मजल मारुन दिली. अखेर राहुलच्या साथीला आलेल्या निकोलस पूरनने आक्रमक पवित्रा धारण केला. याच्या जोरावर पंजाबने १७ षटकात १५० चा टप्पा पार केला. न्नईसाठी शार्दुल ठाकुरने 2 गडी बाद केले तर रविंद्र जडेजा आणि पीयूष चावलाला 1-1 विकेट मिळाली. शार्दुलने सलग 2 चेंडूत राहुल आणि पूरनला बाद केले.

चेन्नई सुपर किंग्जने किंग्ज इलेव्हन पंजाबने ठेवलेल्या १७९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दमदार सुरुवात केली. सलामीवीर शेन वॉटसनने फाफ ड्युप्लेसिसच्या साथीने दणक्यात सुरुवात करत पॉवर प्लेमध्येच ६० धावा करुन पंजाबला बॅकफूटला ढकलले. दोघांनी मिळून १० व्या षटकाताच संघाचे शतक धावफलकावर लावले. या दोघांनी माईक हसी आणि मुरली विजयचा सीएसकेकडून सर्वात मोठी सलामी देण्याचा विक्रम मोडला. या दोघांनी २०११ ला आरसीबी विरुद्ध १५९ धावांची सलामी दिली होती. फाफ आणि वॉटसनने १८१ धावांची नाबाद सलामी दिली. याच जोरावर १७.४ षटकातच या दोन सीएसकेच्या वाघांनी पंजाबचे आव्हान पार केले. फाफने नाबाद ८७ धावांची तर वॉटसनने ८३ धावांची तुफानी खेळी केली.

आयपीएल 2020 मध्ये चेन्नई आतापर्यंत 5 सामने खेळली आहे. चेन्नईने सत्रातील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता. यानंतर चेन्नईला सलग 3 सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला. या दुसऱ्या विजयासोबत चेन्नईचे आता 4 गुण झाले आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.