दक्षिण आफ्रिकेत क्रिकेट बोर्ड निलंबित

 

केपटाउन, वृत्तसंस्था । दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाला मोठा धक्का बसला आहे. क्रिकेट बोर्डाला निलंबित करून सरकारने क्रिकेटला स्वत:च्या ताब्यात घेतले आहे.

गेल्या काही दिवसापासून आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डात अंतर्गत वाद सुरू आहे. या कारवाईमुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघावर मान्यतेची टांगती तलवार आहे.

सरकारने बोर्डाला निलंबित केल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना अर्थात आयसीसी आफ्रिकेच्या संघाची मान्यता रद्द करू शकते. ज्यामुळे आफ्रिकेचा संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर होऊ शकतो.

दक्षिण आफ्रिकन कंफेडरेशन अॅण्ड ऑलिंपिक कमिटीने क्रिकेट दक्षिण आफ्रिकेला पत्र लिहून कळवले आहे. बोर्डातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रशासनातून बाहेर पडण्यास सांगितले आहे. गेल्या डिसेंबरपासून बोर्डात अनेक चूकीच्या गोष्टी सुरू आहेत. बोर्डात सुरू असलेल्या गोष्टींची चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

बोर्डात सुरू असलेल्या या गोष्टींमुळे बोर्डाचे सदस्य, माजी सदस्य, राष्ट्रीय संघाचे सदस्य, स्टेक होल्डर्स, स्पॉन्सर्स आणि क्रिकेट चाहते यांची काळजी वाढली आहे. यामुळे या सर्वांचा बोर्डावरील विश्वास उडाला आहे आणि क्रिकेटची प्रतिमा खराब झाली आहे.

Protected Content