ड्रग्ज प्रकरणात कन्नड अभिनेत्रीसह दोघांना अटक

बंगळुरु वृत्तसंस्था । ड्रग्ज प्रकरणात कन्नड अभिनेत्री रागिणी द्विवेदीसह आणखी दोन जणांना अटक झाली आहे. बंगळुरुच्या केंद्रीय गुन्हे शाखेने कन्नड चित्रपट उद्योगातील अमली पदार्थ सेवन आणि व्यवसाय प्रकरणाच्या तपासादरम्यान ही कारवाई केली. रागिनीच्या वकिलांकडून सोमवारपर्यंत वेळ मागण्यात आला होता. मात्र, त्याआधीच ही अटक झाली.

अभिनेत्री रागिनी द्विवेदीशिवाय या प्रकरणात राहुल आणि विरेन खन्ना नावाच्या दोन व्यक्तींनाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी गुरुवारी (3 सप्टेंबर) रविशंकर नावाच्या अन्य एका व्यक्तीलाही अटक केलं होतं. त्यामुळे आता या प्रकरणात एकूण चार जणांना अटक झाली आहे.

बंगळुरुचे संयुक्त पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) संदीप पाटिल म्हणाले, ‘रागिनी द्विवेदीला अटक करण्यात आली आहे. खन्ना नावाचा व्यक्ती मोठ्या पार्ट्यांचं आयोजन करत होता. या पार्टीतच तो अमली पदार्थ उपलब्ध करुन देत होता. तो दिल्लीत होता. सीसीबीच्या दोन अधिकाऱ्यांनी दिल्लीत जाऊन त्याला अटक केली आहे. त्याला 4 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याआधी सीसीबीने शुक्रवारी सकाळी अभिनेत्री रागिनीच्या बंगळुरुमधील घरावर छापा टाकला होता. दुपारी अभिनेत्री रागिनीला सीसीबी कार्यालयात नेण्यात आलं. त्याच प्रकरणी तिची चौकशी करण्यात आली.

Protected Content