भारतीय फलंदाज ढेपाळले : ऑस्ट्रेलियास २४१ धावांचे आव्हान !

अहमदाबाद-वृत्तसंस्था | येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या विश्‍वचषकाच्या अंतीम सामन्यात भारतीय फलंदाजी अक्षरश: ढेपाळल्यामुळे ऑस्ट्रेलियास अवघ्या २४१ धावांचे आव्हान मिळाले आहे.

जगभरातील क्रिकेट रसिकांचे लक्ष लागून असलेल्या विश्‍वचषकाचा अंतिम सामना सुरू झाला असून यात भारताला पहिल्यांदाच शुभमनच्या रूपाने धक्का बसला आहे.

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आज भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये आज फायनल मॅच खेळली जात आहे. यात नेमकी बाजी कोण मारणार याची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. जगातील सर्वात मोठे असणारे हे स्टेडियम तुडुंब भरले असून खुद्द पंतप्रधान मोदी यांच्यासह विविध क्षेत्रांमधील मान्यवरांची मांदियाळी देखील सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आलेली आहेत.

दरम्यान, सामनाच्या आधी नाणेफेक झाली. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमीन्स याने नाणेफेक जिंकली. यात त्याने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सलामीची जोडी रोहित शर्मा आणि शुभमन गिल मैदानात उतरले. रोहितने फटकेबाजी करत भारताला चांगली सुरूवात करून दिली. मात्र ३० धावा असतांना शुभमन गिल बाद झाला. त्याला स्टॉर्कच्या गोलंदाजीवर ऍडम जंपा याने त्याचा झेल घेतला. यानंतर विराट कोहली फलंदाजीसाठी मैदानात उतरला. या जोडीने जोरदार फटकेबाजी करत धावफलक हलता ठेवला. रोहितने फटकेबाजी केल्याने तो मोठी खेळी करेल असे वाटत असतांनाच ४७ धावांवर असतांना त्याला मॅक्सवेलने बाद केले. हेडने त्याचा अतिशय उत्कृष्ट असा झेल घेतला. तर श्रेयस अय्यर हा देखील फार काळ तग धरू शकला नाही. त्याला पॅट कमीन्सच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक इंग्लीस याने टिपले.

यानंतर भारतीय फलंदाजीची धुरा विराट कोहली व के. एल. राहूल यांच्यावर आली. त्यांनी कोणताही धोका न पत्करता खेळण्यास प्रारंभ केला. दरम्यान विराटने आपले अर्धशतक पूर्ण केल्यामुळे तो मोठी खेळी करेल असे संकेत मिळाले. तथापि, ५४ धावांवर असतांना पॅट कमीन्सने त्याला त्रिफळाचीत केले. यामुळे १४८ धावांवर चार बाद अशी स्थिती झाली. यानंतर रवींद्र जडेजा फलंदाजीसाठी मैदानात उतरला. मात्र तो देखील टिकाव धरू शकला नाही. २२ धावांवर असतांना यष्टीरक्षक इंग्लीसकडे त्याने झेल दिला. हेजलवुडने त्याला टिपले. यानंतर राहूल आणि सूर्यकुमार यादव यांच्यावर मोठी जबाबदारी आली. राहूलने नेटाने फलंदाजी सुरू केली. मात्र ६६ धावांवर त्याला हेजलवुडने बाद केल्याने भारतीय इनिंग पुन्हा संकटात आली.

मोहंमद शामी, जसप्रीत बुमराह यांनी देखील फारशी चमकदार कामगिरी केली नाही. तर सूर्यकुमार यादव हा देखील १८ धावा काढून तंबूत परतला. तर शेवटच्या चेंडूवर धावबाद झाल्याने भारताने सर्व बाद २४० धावा केल्याने कांगारूंना विजयासाठी २४१ धावांचे लक्ष्य मिळाले आहे.

Protected Content