पॅसेंजर गाड्या बंद असल्यामुळे दहा महिन्यांपासून गैरसोय ! (व्हिडीओ)

पाचोरा प्रतिनिधी । कोरोनामुळे मार्च महिन्यापासून भुसावळ विभागातून धावणाऱ्या सर्व पॅसेंजर अद्यापही बंदच आहेत. यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय होत असून, सर्व सामान्य गरिब प्रवाशांना पॅसेंजर बंद असल्यामुळे खाजगी वाहनांना जादा पैसे मोजून प्रवास करावा लागत आहे. 

राज्यात कोरोना संसर्गाचा परिणाम लक्षात घेता, रेल्वे बोर्डाने देशभरातील सर्व प्रकारच्या प्रवासी रेल्वे सेवा बंद केल्या होत्या. त्यानंतर टप्प्या – टप्प्याने रेल्वे सेवा सुरू केलीआहे. मात्र यामध्ये सर्व सामान्य प्रवाशांसाठी कुठल्याही पॅसेंजर सुरू केल्या नसून, विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. तर या गाड्यांमध्ये आरक्षित टिकिट असणाऱ्या प्रवाशानांच प्रवेश देण्यात येत आहे. तसेच सध्या धावणाऱ्या विशेष गाड्यांची संख्या अत्यंत कमी असल्यामुळे, या गाड्यांना लवकर आरक्षण मिळत नसल्यामुळे प्रवाशांची अधिकच गैरसोय होत आहे. तसेच या गाड्यांना जनरल तिकीट बंद आहे. त्यामुळे सर्व सामान्य प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पॅसेंजर सुरू होण्याची प्रतिक्षा….

विविध एक्सप्रेस सुरू करण्यात येत असतांना दुसरीकडे मात्र, भुसावळ विभागातून धावणाऱ्या मुंबई पॅसेंजर, देवळाली पॅसेंजर, सुरत पॅसेंजर, धुळे पॅसेंजर आदी पॅसेंजर सेवा बंद आहे. पॅसेंजर रेल्वे भाड्याच्या दृष्टीने परवडणारी रेल्वे असते. मात्र, आता प्रवाशांना जादा पैसे मोजून खाजगी बसने प्रवास करावा लागत आहे.

गरिब प्रवाशांची होतेय फरफट….

कोरोनाचे कारण सांगून रेल्वे प्रशासनातर्फे अद्यापही पॅसेंजर बंद असल्यामुळे, याचा सर्वाधिक फटका गरिब प्रवाशांना बसत आहे, नाशिक, पुणे, मुंबई किंवा जिल्ह्याच्या इतर ठिकाणी जाण्यासाठी बहुतांश प्रवाशी कमी भाडे असलेल्या पॅसेंजरचाच आधार घेतात. मात्र, पॅसेंजर बंद असल्यामुळे याप्रवाशांना गावांना जाण्यासाठी तिप्पट भाडे खर्च करून जावे लागत आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=3538428726277049&id=508992935887325

 

Protected Content