सेवानिवृत्त शिक्षकाचा प्रामाणिकपणा : जास्तीचे आलेले ६ लाख रुपये केले परत

पाचोरा, प्रतिनिधी | तालुक्यातील नगरदेवळा येथील सेवानिवृत्त शिक्षकाच्या बॅंक खात्यात नजरचुकीने जास्तीचे ६ लाख रुपये जमा झाले. निवृत्त शिक्षकाने प्रामाणिकपणा दाखवत संबंधितास तात्काळ भ्रमणध्वनीद्वारे कळवुन जास्तीचे आलेले ६ लाख रुपये परत केल्याने निवृत्त शिक्षकाचे परिसरातून कौतुक केले जात आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नगरदेवळा येथील सेवानिवृत्त शिक्षक हे शेती व्यवसाय करतात. त्यांनी यावर्षी त्यांच्या शेतात मका पिकाची लागवड केली होती. मका पिक हे परिपक्व झाल्यानंतर पिकाची काढणी केल्यानंतर सदरील मका त्यांनी लक्ष्मीनारायण जिनिंगचे मालक लक्ष्मण वाणी यांना विकला. लक्ष्मण वाणी यांनी मका खरेदी केल्यानंतर झालेली रक्कम ४३ हजार ९०० रुपये तुमच्या बॅंक खात्यात आर. टी. जी. एस. ने पाठवतो असे सांगितले. त्यानुसार अशोक भावसार यांना त्यांच्या सेंट्रल बँक आँफ इंडिया च्या खात्यात ६ लाख ४३ हजार ९०० रूपये जमा झाल्याचा संदेश मोबाईलवर आला. याबाबत अशोक भावसार यांनी तात्काळ जिनिंग मालक लक्ष्मण वाणी यांच्याशी संपर्क केला. त्यांना चुकून जास्तीचे ६ लाख रूपये तुम्ही पाठविल्याचे लक्षात आणून दिल्यानंतर अशोक भावसार यांनी आपले ४३ हजार ९०० रूपये शिल्लक ठेवून उर्वरित ६ लाख रूपये:ही रक्कम पुन्हा आर. टी. जी. एस. करून लक्ष्मीनारायण जिनिंगच्या खात्यावर परत पाठवली. यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जिनिंग मालकास त्यांची लक्ष्मी परत मिळाली. अशोक भावसार यांनी दाखविलेल्या प्रामाणिपणाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. सेवानिवृत्त शिक्षक अशोक भावसार येथील ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच तथा ज्येष्ठ पत्रकार म्हणून परिचित आहेत.

Protected Content