खासदारकी नव्हे वैशालीताई सूर्यवंशीचे आमदारकीच ‘टार्गेट’ !

पाचोरा-नंदू शेलकर ( लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट ) | माजी आमदार आर.ओ. तात्या पाटील यांच्या कन्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी आधी आपण लोकसभा लढविणार असल्याचे जाहीर केले असले तरी आजच्या शिवसंवाद यात्रेत त्यांच्या समर्थकांनी त्या विधानसभेच्या रिंगणातच उतरण्याचे संकेत दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

राज्यातील राजकीय अस्थिरतेच्या कालखंडात पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरआप्पा पाटील यांनी एकनाथ शिंदे यांची साथ घेतली असून ते अगदी पहिल्या दिवसापासूनच शिंदेंच्या गटात सहभागी झाले आहेत. त्यांनी स्वतंत्र मार्ग निवडल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. यातच किशोरआप्पांनी मंत्रीपदासाठी मुंबईत जोरदार लॉंबींग देखील केले. यानंतर आकस्मीकपणे त्यांची चुलत बहिण म्हणजेच दिवंगत आमदार आर.ओ. तात्या पाटील यांच्या कन्या सौ. वैशालीताई सूर्यवंशी यांनी थेट विरूध्द भूमिका घेत आपण वडिलांच्या इच्छेनुसार मातोश्री सोबत राहणार असल्याचे जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्यांनी पाचोर्‍यात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर मुंबईत मातोश्रीवर जाऊन उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना पाठींबा व्यक्त केला.

या भेटीनंतर वैशालीताई सूर्यवंशी या स्थानिक पातळीवर जोरात सक्रीय झाल्या. शहराच्या मध्यवर्ती भागात असणार्‍या शिवालय या किशोरआप्पा पाटील यांच्या संपर्क कार्यालयातून त्यांना बेदखल करण्यात आले. ही इमारत तात्यांच्या व पर्यायाने वैशालीताईंच्या मालकीची असल्याने आप्पांनी तेथून आपले कार्यालय हलविले असून लवकरच आपण भव्य कार्यालय बांधणार असल्याची घोषणा केली आहे.

दरम्यान, वैशालीताई सूर्यवंशी यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत आपण आपले वडील आर.ओ. तात्यांची अपूर्ण राहिलेली इच्छा म्हणजेच जळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले होते. नंतर त्यांनी याबाबत काहीही भाष्य केले नाही. तथापि, आज झालेल्या शिवसंवाद यात्रेत वैशालीताईंचे समर्थक गणेश परदेशी यांनी केलेले एक वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेला आमंत्रण देणारे ठरले आहे.

गणेश परदेशी म्हणाले की, वैशालीताई या लोकसभेची निवडणूक लढविणार नसून त्या पाचोर्‍यातून आमदारकीची निवडणूक लढवतील, आणि आम्ही सर्व जण त्यांना निवडून आणू. परदेशी यांच्या वक्तव्याचा सरळ रोख हा वैशाली सूर्यवंशी यांचे टार्गेट हे विधानसभा निवडणूक असल्याचे आहे. असे झाल्यास पाचोरा विधानसभा मतदारसंघात अतिशय काट्याची टक्कर होणार आहे.

आमदार किशोरआप्पा पाटील हे २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत अवघ्या १७०० मतांनी निसटते निवडून आले आहेत. आता आप्पांसमोर त्यांचीच बहिण उभी राहिली तर याचा विधानसभेच्या निकालावर नेमका काय परिणाम होणार ? याकडे पाहणे देखील औत्सुक्याचे राहणार आहे. मात्र भाऊ-बहिणीची लढाई ही त्रयस्थ उमेदवाराच्या पथ्यावर देखील पडणार का ? याचे उत्तर देखील येणारा काळच देणार आहे. अर्थात, या सर्व बाबींना अजून अवकाश असला तरी आजच्या शिवसंवाद यात्रेने याला फोडणी मिळालीय हे नाकारता येणार नाही.

आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या सोबत बरेचसे पदाधिकारी असले तरी वैशालीताई सूर्यवंशी यांच्या बाजूने देखील मोठी फळी भक्कमपणे उभी राहिल्याचे आजच्या शिवसंवाद कार्यक्रमातून अधोरेखील झाले आहेत. अभय पाटील यांच्यासारखे आक्रमक आणि कायदेतज्ज्ञांपासून ते विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते आजच्या कार्यक्रमात सक्रीयपणे दिसून आले आहेत. आगामी काळात किशोरआप्पांना थोडी सावध भूमिका घ्यावी लागेल असे यातून दिसून आले आहे. अर्थात, भाऊ विरूध्द बहिणीच्या लढाईतला पहिला अंक हा आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत घडणार आहे. यातून मतदारसंघाच्या आगामी राजकीय वर्चस्वाची दिशा बर्‍यापैकी समजणार आहे.

Protected Content