विरोधक निकालाआधी पुन्हा करणार निवडणूक आयोगाकडे ईव्हीएमबाबत तक्रार

opposition

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास उरलेले असतानाच विरोधकांनी पुन्हा ईव्हीएमबाबत पुन्हा राग आवळला आहे. दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये १९ विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक नुकतीच पार पडली असून टीडीपीचे नेते चंद्राबाबू नायडू, काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद आणि अहमद पटेल आदी नेते ईव्हीएमबाबत तक्रार करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे रवाना झाले आहेत.

 

या बैठकीत १०० टक्के ईव्हीएम मशीनसोबत व्हीव्हीपॅट मशीन जोडण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे लावून धरण्यावर चर्चा करण्यात आली. तब्बल तासभर ही चर्चा झाल्यानंतर चंद्राबाबू नायडू, गुलाम नबी आझाद आणि अहमद पटेल यांच्यासह इतर नेते निवडणूक आयोगाकडे रवाना झाले आहेत. यावेळी ईव्हीएमला व्हीव्हीपॅट जोडण्याबरोबरच उत्तर प्रदेशातील ईव्हीएमच्या सुरक्षेवरही चर्चा करण्यात आली. तर केंद्रात त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास काय निर्णय घ्यायचा? याबाबतची चर्चा करण्यात आलल्याचेही सूत्रांनी सांगितले. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री आणि टीडीपीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीला डावे पक्ष, बसपा, सपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि टीएमसीच्या नेत्यांनी हजेरी लावली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद, बसपा नेते सतीशचंद्र मिश्रा, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मार्क्सवादी नेते सीताराम येचुरी, टीएमसीचे डेरेक ओ ब्रायन आणि सपा नेते रामगोपाल यादव आदी नेते उपस्थित होते.

Add Comment

Protected Content