जळकेकर महाराज रॉक्स : ‘फायरब्रँड’ कार्यकर्ता ते भाजपचा कॅप्टन !

जळगाव-संदीप होले ( एक्सक्लुझीव्ह पॉलिटीकल ॲनालिसीस ) | भारतीय जनता पक्षाने आज तिन्ही जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करतांना धक्कातंत्राचा वापर करत नव्या चेहर्‍यांना संधी दिली असून यात ज्ञानेश्‍वर महाराज जळकेकर यांच्याकडे जळगाव लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविली आहे. त्यांची नियुक्ती ही अल्प काळात पक्षात केलेल्या चमकदार कामगिरीचे पारितोषीक तर आहेच, पण याच्या जोडीला पक्षाने थोडा गिअर बदलल्याचेही दिसून येत आहे.

( Image Credit Source : Live Trends News )

भारतीय जनता पक्षाने आज जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर केली. यात पहिल्यांदाच दोन ग्रामीण आणि एक शहरी असे तीन जिल्हाध्यक्ष निवडण्यात आले. यात जळगाव लोकसभेतून ज्ञानेश्‍वर महाराज जळकेकर तर रावेरातून अमोल जावळे आणि जळगाव महानगरातून उज्वला बेंडाळे यांना संधी मिळाली. यातील ज्ञानेश्‍वर महाराज पाटील जळकेकर यांना जळगावची मिळालेली जबाबदारी ही अनेक अर्थांनी लक्षणीय मानली जात आहे.

हे देखील वाचा : जळकेकर महाराजांचा चंद्रशेखर अत्तरदेंना पाठींबा

यातील ज्ञानेश्‍वर महाराज पाटील जळकेकर हे तरूण आणि ‘फायरब्रँड’ म्हणून ख्यात आहेत. जळगाव तालुक्यातील जळके येथील एका मराठा शेतकरी कुटुंबात जन्मलेले ज्ञानेश्‍वरजी हे ख्यातनाम किर्तनकार आहेत. ते किती फेमस आहेत हे पहावयाचे असेल तर एकदा फेसबुक, युट्युब आणि गुगल सर्च करून बघा ! अतिशय प्रसन्न शैलीत रसाळ किर्तन करणारे ज्ञानेश्‍वर महाराज हे अमोघ वक्ते आहेत. धारदार आवाज आणि विलक्षण वाक कौशल्याच्या बळावर त्यांनी आध्यात्मिक क्षेत्रात जसा लौकीक मिळवला तसाच राजकारणातही अल्पावधीतच संपादन केला. तर सोशल मीडियातही ते स्टार आहेतच !

ज्ञानेश्‍वर महाराज पाटील जळकेकर यांच्या राजकिय कारकिर्दीचा प्रारंभ शिवसेनेतून झाला. गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून ते शिवसेनेत आले. अल्प काळातच त्यांच्याकडे जिल्हा संघटक पदाची जबाबदारी आली. विरोधकांवर कडाडून प्रहार करणारा युवा नेता म्हणून त्यांचा लौकीक होत असतांनाच गुलाबभाऊ आणि त्यांच्यात दरी निर्माण झाली. याला निमित्त ठरले ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदाचे ! २०१७ साली झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत ना. गुलाबराव पाटील यांनी शब्द देऊन देखील त्यांना स्वीकृत संचालक केले नाही म्हणून ते नाराज झाले. यातून त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी गुलाबभाऊंच्या विरोधात रान उठवून खळबळ उडवून दिली.

हे देखील वाचा : जनता शेतकर्‍याच्या मुलालाच निवडून देणार : जळकेकर

लक्ष्मण पाटील उर्फ लकी टेलर आणि माजी जिल्हा परिषद उपसभापती जानकीराम पाटील यांच्या जोडीने त्यांनी जळगाव ग्रामीणमधील वातावरण ढवळून काढले. यातच आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर ज्ञानेश्‍वर महाराज जळकेकर हे भारतीय जनता पक्षात दाखल झाले. आणि त्यांनी भाजपच्या पाठींब्यावर उभे असलेले चंद्रशेखर अत्तरदे यांच्या पाठीशी आपली ताकद लावली. या निवडणुकीत त्यांना अपयश आले असले तरी संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेण्यात ते यशस्वी ठरले हे नाकारता येणार नाही.

अल्प काळातच ज्ञानेश्‍वर महाराज जळकेकर यांच्याकडे भाजपच्या आध्यात्मीक आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आली. तर भाजपमध्ये एंट्री करून चार वर्षे पूर्ण होत नाही तोच त्यांच्याकडे थेट जिल्हाध्यक्षपद आले आहे. ते जितके प्रखर वक्ते आणि धाडसी स्वभावाचे नेते आहेत, तितकेच महत्वाकांक्षी देखील आहेत. यामुळे भारतीय जनता पक्षाने जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवून त्यांच्या कार्यक्षमतेची पावती दिलेली आहे.

आज भारतीय जनता पक्षात गिरीशभाऊंपासून ते अनेक मोठे नेते आहेत. यातील अनेक चांगले वक्ते देखील आहेत. मात्र ज्ञानेश्‍वर महाराज जळकेकर हे त्यांच्यापेक्षा वक्तृत्वाच्या बाबतीत नक्कीच सरस आहेत. आगामी काळात निवडणुका येत असल्याने महाराजांच्या आक्रमक शैलीचा भाजपला लाभ होण्याचे गणीत त्यांच्या नियुक्तीच्या मागे असण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा : भाजपचे जिल्हाध्यक्ष जाहीर; तरूणांना पसंती

भारतीय जनता पक्षातील बहुतांश नेते शांत-संयमी शैलीत काम करत असतांना अलीकडच्या काळात मंगेश चव्हाण यांच्या सारख्या आक्रमक तरूण नेतृत्वाकडे दुध संघाची धुरा सोपविण्यात आल्यानंतर आता ज्ञानेश्‍वर महाराज जळकेकर यांच्यासारख्या तुफानी आक्रमक नेत्याकडे जिल्हाध्यक्षपद सोपवून पक्षाने आगामी काळातील वाटचालीचा ‘रोड मॅप’ हा आक्रमक राहिल असा संदेश दिला आहे.

जळकेकर महाराज कुणालाही अंगावर घेऊ शकतात, तरूणाईशी तरूणांच्या तर वयोवृध्दांशी त्यांच्या भाषेत संवाद साधू शकतात. लक्षणीय बाब म्हणजे आगामी काळात भाजपने एकट्याने लढण्याची भूमिका घेतली तर ते जळगाव लोकसभा क्षेत्रातील अन्य पक्षाच्या मातब्बर नेत्यांशी टक्कर घेण्यास सक्षम आहेत. यामुळे जळकेकर महाराजांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने गिअर बदलल्याचेही मानले जात आहे. भाजपची गाडी ही आता आक्रमक शैलीत पुढे जाण्याची शक्यता आहे.

ज्ञानेश्‍वर महाराज पाटील जळकेकर यांचे भाजपमधील सर्व नेत्यांशी चांगले सुर जुडले आहेत. यात गिरीशभाऊ महाजन, खा. उन्मेष पाटील, राजूमामा भोळे, मंगेश चव्हाण, अमोल शिंदे आदींसह इतरांचा समावेश आहे. याचा आगामी वाटचालीत आणि विशेष करून निवडणुकांच्या कार्यकाळात त्यांना लाभ होणार आहे. त्यांच्याच कार्यकाळात लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून यात पक्षाला विजय मिळवून देण्याची मोठी जबाबदारी आणि आव्हान त्यांच्या समोर आहे. यात ते कितपत यशस्वी होतात याचे उत्तर येणारा काळच देणार आहे. तथानि, एका तरूण आणि जोशील्या नेत्याला पक्षातील प्रवेशाच्या चौथ्या वर्षातच जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवून भाजपने मोठी खेळी केली आहे. यामुळे फायरब्रँड ज्ञानेश्‍वर जळकेकर महाराज यांच्यावरी जबाबदारी देखील तितकीच वाढलेली आहे.

Protected Content