फेक कॉल सेंटरच्या माध्यमातून गंडविणारा अटकेत

जळगाव प्रतिनिधी । एचडीएफसी बँकेत नोकरी लाऊन देण्याच्या नावाखाली म्हसावद येथील तरूणाची ९३ हजार रूपयात फसवणूक करणार्‍याला जळगाव सायबर क्राईमच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.

हसावद येथील सचिन संजय मराठे या बेरोजगार युवकाने नोकरी मिळण्यासाठी ऑनलाइन जॉब वेबसाईटवर नोंदणी केली होती. त्याला १२ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर २०१८ रोजी रवीसिंग, करण भातपूर, संग्राम भालेराव, करण लुत्रा, अनुभूती तनेजा, अनिल सिंग व श्रेया असे नाव सांगणार्‍या व्यक्तींनी मोबाइलवर कॉल करुन संपर्क साधला. त्याला एचडीएफसी बँकेत नोकरीला लावण्याचे आमिष देऊन वेगवेगळ्या कारणांसाठी ९३ हजार रुपये त्याच्याकडून घेतले. तसेच बँकेचे बनावट नियुक्तीपत्र पाठवून फसवणूक केली. या प्रकरणी मराठे याच्या फिर्यादीवरुन जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सायबर पोलिसांनी तपास केला असता हा प्रकार अनिलकुमार सुरेश कुमार उर्फ विक्रम यादव व राहुल मदनलाल चौरसिया (रा. आझादनगर, चंदोली, उत्तर प्रदेश) यांनी केल्याचे दिसून आले. संशयितांचा शोध घेण्यासाठी सायबर पोलिसांचे पथक दिल्लीला रवाना झाले होते. या पथकाने दोन दिवस दिल्ली येथे संशयिताचा शोध घेतला. अखेर विक्रम यादव या दिल्लीतील रणहोला या भागातून पथकाने त्याला ताब्यात घेतले. यादव याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्याला २८ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

जळगाव सायबर पोलीस पथकाचे पोेलिस उपनिरीक्षक अंगद नेमाने व दिलीप चिंचोले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई दीपक सोनवणे, बाळकृष्ण पाटील, प्रवीण वाघ, श्रीकांत चव्हाण यांच्या पथकाने पार पाडली.

Protected Content