सत्ता संघर्षात आ. गिरीश महाजन बजावणार ‘ही’ भूमिका !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील सत्ता संघर्षात नेमके काय सुरू आहे याबाबत मोठे संभ्रमाचे वातावरण असतांनाच माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांचा एक निर्णय हा निर्णायक ठरण्याची शक्यता असून भाजपने आता हा नवीन डाव टाकण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.

शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्या गटाला एक तर भाजपमध्ये विलीन व्हा अन्यथा अपात्रतेला सामोरे जा असे दोन पर्याय दिले आहेत. या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात १६ आमदारांना आज अपात्रतेच्या नोटीसा मिळाल्या आहेत. याच्या विरोधात हे सर्व आमदार उद्याच सुप्रीम कोर्टात जाणार आहेत. यात त्यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी वेळ वाढवून मिळणार की नाही ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने देखील आता रणनिती आखण्यास प्रारंभ केला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. यामुळे विधानसभाध्यक्ष निवडीत अडसर निर्माण झालेला आहे. ही बाब लक्षात घेता, आमदार गिरीश महाजन हे उद्याच आपली याचिका सुप्रीम कोर्टातून मागे घेणार आहे. यामुळे विधानसभा अध्यक्षांची निवड घेण्याचा मार्ग मोकळा होणार असून तिथेच महाविकास आघाडीला खिंडीत पकडून आपला विधानसभा अध्यक्ष निवडून आणायचा आणि मग नंतर अविश्‍वास प्रस्ताव दाखल करून ठाकरे सरकार पाडायचे अशी रणनिती भाजपची असू शकते. या संदर्भात उद्या अजून चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. तूर्तास आमदार गिरीश महाजन यांनी याचिका मागे घेतल्यास यातून भाजपला सत्ता स्थापनेच्या दिशेने एक दमदार पाऊल टाकता येणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

Protected Content