
पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा शहरासह बोरी मध्यम प्रकल्पावर अवलंबून असलेल्या परिसरातील गावांना आगामी काळात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी आमदार अमोल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत बोरी मध्यम प्रकल्पातील उपलब्ध जलसाठा, पाणी आरक्षण आणि आगामी काळातील पाणीपुरवठ्याचे नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बोरी मध्यम प्रकल्पातून जून ते सप्टेंबर २०२६ या कालावधीसाठी पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यात आलेल्या जलसाठ्याचा आढावा बैठकीत घेण्यात आला. उपलब्ध पाण्याचा योग्य वापर, नियोजनबद्ध वितरण आणि भविष्यातील संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. जलसंपदा विभागाकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार यंदा एल-निनो परिस्थितीचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. पारोळा शहरासाठी बोरी मध्यम प्रकल्पातून आवश्यक पाणी आरक्षित ठेवण्यात आले असून, नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी प्रशासनाने दक्ष राहण्याचे निर्देश देण्यात आले.
बैठकीत पारोळा शहरासोबतच बोरी मध्यम प्रकल्पावर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागातील गावांच्या पाणीपुरवठ्याचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. उपलब्ध जलसाठा, आगामी पावसाळ्यापूर्वीची स्थिती, पाणी वितरण व्यवस्था आणि आपत्कालीन नियोजन याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. नागरिकांना नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा मिळावा यासाठी जलसंपदा विभाग, नगरपरिषद आणि संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश आमदार अमोल पाटील यांनी दिले. पाणी व्यवस्थापनामध्ये कोणतीही हलगर्जी होऊ नये तसेच आवश्यक त्या उपाययोजना वेळेत पूर्ण कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवसेनेचे शहरप्रमुख, गटनेते तथा नगरसेवक अमृत चौधरी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मनिषभाऊ पाटील, नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती मनोजभाऊ जगदाळे, उपगटनेते तथा नगरसेवक पंकज मराठे, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक दिपक अनुष्ठान, बोरी मध्यम प्रकल्पाचे उपअभियंता सिद्धार्थ पाटील, तामसवाडी शाखा अधिकारी प्रितम काकडे, नगरपरिषदेचे बांधकाम अभियंता सुमित पाटील, पाणीपुरवठा अभियंता संकेत कारले यांच्यासह संबंधित अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. पारोळा शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना भविष्यात पिण्याच्या पाण्याची कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकत्रितपणे नियोजनबद्ध पद्धतीने कार्यरत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. आवश्यक त्या सर्व उपाययोजना वेळेत राबविण्यात येतील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.



