
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जळगाव महानगरपालिका प्रशासनाने अत्यंत वेगाने हालचाली सुरू केल्या असून, शहरातील विविध धोकादायक ठिकाणांची युद्धपातळीवर पाहणी करण्यात येत आहे. शहरातील गजबजलेल्या मुळजी जेठा (एम. जे.) महाविद्यालय परिसरातील उघडा आणि धोकादायक बनलेला मोठा नाला नागरिकांसाठी संभाव्य मृत्यूचा सापळा ठरत असल्याचे गंभीर बाब निदर्शनास येताच उपमहापौर मनोज चौधरी यांनी सकाळीच प्रत्यक्ष घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पाहणी केल्यानंतर उपमहापौरांनी मनपा प्रशासनाला तातडीने कडक उपाययोजना करण्याचे आदेश दिले. त्यांच्या या तत्परतेमुळे प्रशासनाने त्वरित हालचाली करत संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी नाल्यावर लोखंडी जाळ्या बसवण्याची प्रत्यक्ष कार्यवाही तातडीने सुरू केली आहे.

शहरात पावसाळ्याची चाहूल लागली असतानाच एम. जे. महाविद्यालयासारख्या अत्यंत वर्दळीच्या आणि गजबजलेल्या परिसरातील उघड्या नाल्याचा प्रश्न दिवसेंदिवस अतिशय गंभीर बनला होता. या उघड्या पडलेल्या नाल्यामुळे परिसरातील हजारो विद्यार्थी, स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांच्या जीविताची सुरक्षा धोक्यात आली होती. याची तीव्र दखल घेत उपमहापौर मनोज चौधरी यांनी मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह थेट घटनास्थळी जात नाल्याची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेतली. एम. जे. महाविद्यालय परिसरात तीन ते चार नामांकित प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत; तसेच या मुख्य भागातून जिम, कॉम्प्युटर कोर्सेस आणि महाविद्यालयीन कामांसाठी दररोज हजारो विद्यार्थ्यांची व नागरिकांची मोठी ये-जा सुरू असते. रस्त्यालगतच असलेला हा प्रचंड मोठा नाला अनेक ठिकाणी पूर्णपणे उघडा पडला असून, पावसाळ्यात यामध्ये पाणी भरल्यानंतर रस्त्याचा आणि नाल्याचा अंदाज येणे वाहनचालकांना कठीण होऊ शकते, अशी भीती व्यक्त होत होती.
विशेषतः रात्रीच्या वेळी अंधारात किंवा मुसळधार पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यास हा नाला डोळ्यांना दिसून येत नाही. अशा वेळी एखादी मोठी आणि जीवघेणी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पावसाळा सुरू होण्यापूर्वीच येथे तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक होते. याच पार्श्वभूमीवर उपमहापौर मनोज चौधरी यांच्यासह मनपाचे शहर अभियंता योगेश बोरोले आणि आर. टी. पाटील यांनी संपूर्ण नाल्याची सविस्तर पाहणी केली. पाहणीदरम्यान हा नाला केवळ उघडाच नसून काही ठिकाणी त्याची भौतिक अवस्था अत्यंत जीर्ण व धोकादायक झाल्याचे मनपाच्या पथकाला आढळून आले. दोन ते तीन ठिकाणी तर नाल्याची मुख्य रचना प्रचंड कमकुवत झाली असून, मुसळधार पावसात तेथे मोठा अनर्थ ओढवू शकतो, ही बाब समोर आली.
हा नाला आकाराने अत्यंत मोठा आणि खोल झालेला असून, पावसाच्या वेगात एखादे वाहन किंवा व्यक्ती त्यात वाहून गेल्यास तातडीने लक्षात येणेही कठीण होऊ शकते. तसेच नाल्याच्या भिंती काही ठिकाणी खूप कमकुवत झाल्याने त्या अचानक कोसळण्याची शक्यता देखील नाकारता येत नव्हती. या नाल्याला लागूनच अनेक खाऊच्या व नाश्त्याच्या गाड्या उभ्या असतात, जिथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची दिवसभर मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. त्यामुळे वेळेत उपाययोजना न झाल्यास गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता उपस्थित अधिकाऱ्यांनीही मान्य केली. पाहणी पूर्ण झाल्यानंतर उपमहापौर मनोज चौधरी यांनी प्रशासकीय यंत्रणेला दोन महत्त्वाचे आणि कडक आदेश जारी केले आहेत.
उपमहापौरांच्या पहिल्या आदेशानुसार, पावसाळ्यापूर्वी या संपूर्ण उघड्या नाल्यावर मजबूत व दर्जेदार लोखंडी जाळ्या बसवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. नाल्याची कायमस्वरूपी मोठी दुरुस्ती करण्यासाठी आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होण्यास काही काळ लागू शकतो; त्यामुळे तोपर्यंत नागरिकांच्या सुरक्षे तडजोड न करता तातडीचे संरक्षण कवच उभारण्याचे आदेश त्यांनी दिले. तर दुसऱ्या आदेशानुसार, नाल्याची केवळ तात्पुरती डागडुजी न करता त्याची संपूर्ण आणि कायमस्वरूपी सुधारणा करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाचे अधिकृत अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहर अभियंता आणि संबंधित विद्युत व बांधकाम विभागाने तातडीने याचे इस्टिमेट तयार करून पुढील मंजुरीसाठी सादर करावे, असे निर्देश उपमहापौरांनी दिले आहेत. उपमहापौरांच्या या तत्पर कारवाईनंतर मनपा प्रशासनाने तातडीने जागेवरच काम सुरू केले असून, जळगावकरांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत पावसाळ्यापूर्वी आवश्यक ती सर्व कामे पूर्ण करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.



