Home Cities जळगाव आषाढी एकादशीनिमित्त डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेजमध्ये कापडावर साकारली विठ्ठल-रखुमाईची आकर्षक प्रतिमा

आषाढी एकादशीनिमित्त डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेजमध्ये कापडावर साकारली विठ्ठल-रखुमाईची आकर्षक प्रतिमा

0
1

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आषाढी एकादशीचे औचित्य साधत जळगाव येथील डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्समध्ये भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थिनींनी कापडावर (फॅब्रिक पेंटिंग) विठ्ठल-रखुमाईची आकर्षक प्रतिमा साकारत आपल्या कलागुणांचे दर्शन घडविले, तर पारंपरिक दिंडी आणि विठ्ठल नामाच्या गजराने संपूर्ण महाविद्यालय परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल-रखुमाई यांच्या प्रतिमेच्या विधिवत पूजनाने झाली. यावेळी गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (जीआयएमआर)चे संचालक डॉ. प्रशांत वारके, डॉ. वर्षा पाटील बीसीए महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. नीलिमा वारके, डॉ. उल्हास पाटील लॉ कॉलेजच्या प्राचार्या डॉ. नयना झोपे तसेच डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्सच्या प्राचार्या प्रा. कविता देशमुख यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने विद्यार्थिनींनी कापडावर फॅब्रिक पेंटिंगच्या माध्यमातून विठ्ठल-रखुमाईची देखणी प्रतिमा साकारली. या कलाकृतींमधून विद्यार्थिनींची सर्जनशीलता, कलात्मकता आणि भक्तिभाव प्रकर्षाने दिसून आला. उपस्थित मान्यवरांनी या कलाकृतींचे मनापासून कौतुक करत विद्यार्थिनींच्या कलागुणांना दाद दिली. यानंतर महाविद्यालयाच्या वतीने टाळ-मृदुंगाच्या गजरात पारंपरिक दिंडीचे आयोजन करण्यात आले. “विठ्ठल… विठ्ठल…” या अखंड नामघोषात विद्यार्थिनी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. दिंडीनंतर सर्व उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound